मुंबई : कधी कधी मला प्रश्न पडतो की कोकणातला आंबा गोड आहे की कोकणातील लोक गोड आहेत. कोकणातील लोकांशी जर पंगा घेतला तर त्याच्या चार पिढ्या उध्वस्त करतात. चांगल्याला अधिक कसं चांगलं देता येईल हे काम आम्ही करत आहोत. एकही प्रदूषण होणारा उद्योग कोकणात येणार नाही, असा विश्वासपूर्ण शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणवासियांना दिला.
मुंबईतील गोरेगावमध्ये कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी फडणवीस बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी अनेकांना शाब्दिक टोले लगावले.
कोकणाने काही लोकांना भरभरून दिले मात्र, त्यांनी कोकणासाठी काहीच केले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे कोकणच्या विकासाकडे विशेष लक्ष आहे. आगामी काळात कोकणच्या विकासाचे धोरण आखताना नवनवीन योजना सुरु करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
तसेच कोकणात येणारा पर्यटक वर्ग मोठा असल्याने पर्यटनाच्या संदर्भातदेखील कोकणातील जलद गतीने प्रकल्प सुरु करण्यात येतील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.