दिनेश सोनवणे
दौंड : दौंड तालुक्यातील रेल्वे संबंधित विविध प्रश्नांसंदर्भातील पाठपुराव्यासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दिल्ली येथे भेट घेतली. या बैठकीमध्ये मध्य रेल्वे विभाग, दौंड शहर व तालुक्यातील रेल्वे संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी राहुल कुल यांनी केलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाहीसाठी रावसाहेब दानवे हे पुढील आठवड्यात दौंड तालुक्यात येणार असून बैठक व स्थळपाहणीचे आयोजन केले असल्याची माहिती राहुल कुल यांनी दिली.
पुणे – दौंड दैनंदिन प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या मागण्या व विविध समस्या आमदार म्हणून कुल यांनी उपस्थित केल्या. त्यामध्ये दौंड हे रेल्वेचे उपनगर म्हणून घोषित करण्यात यावे, पुणे आणि दौंड दरम्यान लोकल सेवा सुरुवे करावे, दौंड तालुक्यातील सहजपूर, खामगाव येथे मंजूर करण्यात आलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचे काम जलद सुरु करण्यात यावे व पुणे – सोलापूर मार्गावरील दौंड जंक्शन येथे उभारण्यात आलेल्या तिसऱ्या कुरकुंभ मोरीचे उर्वरित तांत्रिक काम तात्काळ पूर्ण करून ती नागरिकांसाठी खुली करण्यात यावी, या प्रमुख मागण्या आमदार कुल यांनी दानवे यांच्यासमोर मांडल्या.
तसेच खुटबाव येथील रेल्वे फाटकावर रेल्वे उड्डाण पूल उभारण्यात यावा, कडेठाण व कानगाव येथे सुरु असलेल्या RUB चा कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठत असून त्याठिकाणी पाण्याच्या निचरा होण्यास होत असलेली तांत्रिक अडचण लक्षात घेता कडेठाण व कानगाव येथे रेल्वे उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात यावेत या मागणीचा दूरगामी परिणाम होणार आहे.
दौंड शहरातील रेल्वे हद्दीमध्ये राहणाऱ्या सुमारे ६७० झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन करावे व पुनर्वसन होईपर्यंत रेल्वे हद्दीमध्ये राहणाऱ्या झोपडपट्टीधारकांची घरे खाली करण्यात येऊ नयेत, ही मागणी देखील आमदार कुल यांच्याकडून करण्यात आली.
दौंड – पुणे दरम्यान धावणाऱ्या मेमु लोकलचे दर पूर्वीप्रमाणे आकारण्यात यावेत व पुणे – हैद्राबाद – पुणे (AC सुपर फास्ट), मुंबई – चेन्नई – मुंबई सुपरफास्ट, LTT – विशाखापट्टणम सुपर फास्ट आदी लांब पल्ल्यांच्या गाड्यांना दौंड स्थानकात थांबा दयावा.
वाढती लोकसंख्या व नागरीकिकरण लक्षात घेता पुणे – दौंड रेल्वे ट्रॅक चे चौपदरीकरण करावे व यवत आणि उरुळी च्या मध्ये सहजपुर, उरुळी आणि लोणी च्या मध्ये नायगाव, मांजरी आणि हडपसर च्या मध्ये अमनोरा आदी नवीन स्थानकांची निर्मिती करावी.
दरम्यान, आमदार राहुल कुल यांनी यावेळी केल्या सर्व मागण्यांच्या बाबत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी आमदार जयकुमार गोरे उपस्थित होते.