मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नसल्याने प्रतीक्षा वाढली आहे. ऑक्टोबर महिन्याची १२ तारीख उजाडली, तरी बँक खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे महिलांमध्ये हप्त्याच्या तारखेबाबत उत्सुकता आणि चिंता आहे. दरम्यान, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र मिळून तीन हजार रुपये खात्यात जमा होऊ शकतात, अशी चर्चा सुरू आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. सप्टेंबर महिन्याचा हप्ता दसऱ्यानंतर जमा होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांचे हप्ते उशिरा मिळाल्यास दिवाळीपूर्वी दोन्ही महिन्यांची मिळून तीन हजार रुपयांची रक्कम महिलांच्या खात्यात जमा केली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. याबाबत अद्याप अधिकृत निर्णयाची प्रतीक्षा आहे.

दरम्यान, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आता १,५०० रुपयांऐवजी २,१०० रुपये मिळणार असून, यासंदर्भात शासन निर्णय जारी झाल्याचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र, हा संदेश बनावट असल्याचे सांगण्यात आले असून, २,१०० रुपयांच्या हप्त्याबाबतचे दावे फेटाळण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या योजनेअंतर्गत पूर्वीप्रमाणेच १,५०० रुपये मिळण्याची तरतूद असल्याचे सांगितले जात आहे.

ज्या लाभार्थी महिलांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही किंवा आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले नाही, त्यांचे पैसे तांत्रिक कारणांमुळे अडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिलांनी आपली कागदपत्रे आणि बँक खात्याशी संबंधित माहिती अद्ययावत ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, १३ ऑक्टोबर रोजी राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. या बैठकीत लाडकी बहीण योजनेच्या प्रलंबित हप्त्याबाबत चर्चा होऊन निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांचे पैसे नेमके कधी जमा होणार, याकडे लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे.






