पुणे : आपल्या लाडक्या मालकाला काय झालंय, तो उठत का नाही, असा जणू प्रश्न विचारत ‘जुली’ सतत भुंकत होती. त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होती. पण मृत्यूने मालकाला हिरावून घेतल्याची जाणीव त्या मुक्या जीवाला कशी होणार? ऐतिहासिक राजगडावर घडलेल्या एका दुर्दैवी घटनेनंतर मालकाप्रती असलेल्या पाळीव श्वानाच्या निष्ठेचे हृदय पिळवटून टाकणारे दृश्य पाहायला मिळाले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मालकाचा मृत्यू झाला, तरी जुलीने त्याची साथ शेवटपर्यंत सोडली नाही. तिचे आर्त भुंकणे आणि मालकाला उठवण्याची धडपड पाहून घटनास्थळी उपस्थित असलेल्यांचेही डोळे पाणावले.

जिग्नेश सदाशिव खंडाळकर (वय ३५) हे मूळचे छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी असून, सध्या पुण्यातील हडपसर येथील भेकराईनगर परिसरात वास्तव्यास होते. शनिवारी ते मित्रांसह राजगड किल्ला पाहण्यासाठी आले होते. पाल बुद्रुक मार्गाने गड चढत असताना पद्मावती माची परिसरात त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. काही क्षणांतच त्यांना चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले.
जिग्नेश जमिनीवर कोसळल्यानंतर जुली त्यांच्याजवळच राहिली. मालकाला उठवण्याचा प्रयत्न करत ती सतत भुंकत होती. मात्र, जिग्नेश यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यांची अवस्था पाहून उपस्थित पर्यटकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. त्यांना सीपीआर देऊन वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले; मात्र हृदयविकाराचा झटका तीव्र असल्याने त्यांचा मृत्यू झाला.


घटनेची माहिती मिळताच वेल्हे पोलीस, पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी, महावितरणचे कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. दुर्गम वाटेवरून जिग्नेश यांचे पार्थिव स्ट्रेचरच्या मदतीने गडाच्या पायथ्याशी आणण्यात येत होते. या संपूर्ण प्रवासात जुली पार्थिवाजवळून चालत राहिली. मालकाच्या साथीने आलेली जुली त्याच्याच सोबत परतत होती; मात्र यावेळी तिचा लाडका मालक कायमचा शांत झाला होता.
मुक्या प्राण्याचे हे निःस्वार्थ प्रेम आणि निष्ठा पाहून मदतकार्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाचे मन हेलावून गेले. शब्दांत भावना व्यक्त करता येत नसल्या, तरी जुलीच्या सततच्या भुंकण्यातून आणि मालकाला सोबत न सोडण्याच्या तिच्या वागण्यातून तिचे प्रेम स्पष्टपणे जाणवत होते.







