कोल्हापूर: भुदरगड तालुक्यातील नाईकवाडी परिसरात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या 23 वर्षीय तरुणीचा मृतदेह खोल दरीत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तरन्नुम नाईक असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, तिच्या मृत्यूप्रकरणी प्रियकर श्रीपाद दिनकर वडार (वय 25) याला पोलिसांनी अटक केली आहे. तरुणीला कड्यावरून ढकलण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात असून, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीपाद शनिवारी पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने तरन्नुमच्या मृत्यूबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांचे पथक शिवडाव-नाईकवाडी परिसरातील दुर्गम भागात पोहोचले. नाईकवाडी धबधब्याजवळील कड्याखाली शोध घेतल्यानंतर तरुणीचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर पोलिसांनी श्रीपादला ताब्यात घेतले आणि चौकशी सुरू केली.

चौकशीदरम्यान श्रीपादने दोघांचे गेल्या साडेपाच वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. तरन्नुमच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसरीकडे ठरवल्यामुळे दोघेही मानसिक तणावात होते, असा दावा त्याने केला. दोघांनी एकत्र जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले. त्यानुसार ते कड्याजवळ गेले. तरन्नुमने दरीत उडी मारली, मात्र आपण उडी मारण्याचे धाडस करू शकलो नाही, असे त्याचे म्हणणे आहे.

श्रीपादने दिलेल्या जबाबाला पुष्टी देणारा ठोस पुरावा अद्याप मिळालेला नसल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी दोघांच्या मोबाईलमधील चॅट तपासले असता, आत्महत्येचे नियोजन केल्याचे स्पष्ट संकेत मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. तरन्नुमचे लग्न दुसरीकडे ठरत असल्याने श्रीपाद अस्वस्थ असल्याचे काही संदेशांतून दिसून आल्याचा पोलिसांचा दावा आहे.
श्रीपादला न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दोघांचे मोबाईल फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी जप्त करण्यात आले असून, मृत्यूमागील नेमके कारण आणि घटनाक्रम शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.







