शिमला / धर्मशाळा : हिमाचल प्रदेशात मुख्य लढत ही भारतीय जनता पक्ष व काँग्रेसमध्येच असणार आहे. यावेळी आम आदमी पार्टीने देखील हिमाचलमध्ये उमेदवार उभे केले असले तरी ते कितपत प्रभाव टाकू शकतील याबाबत साशंकता असल्याचे बोलल्या जात आहे. या निवडणकीत ७०. ९४ टक्के मतदान झाले आहे. यावेळी उणा येथे सर्वाधिक ७६.६९ टक्के तर सर्वात कमी कुलूमध्ये ६७. ४१ टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याने नक्की याचा फायदा कुणाला होतो, हे पाहणे रंजक ठरणारे आहे.
हिमाचल प्रदेशातील उनामध्ये सर्वाधिक ७६.६९, सोलनममध्ये ७३. २१, लाहौल स्पितीमध्ये ६७. ५४, बिलासपूरमध्ये ६९.७२, चंबामध्ये ७०. ७४, कांगडामध्ये ७१.२७, कुलूमध्ये ६८. २१ तर मंडीमध्ये ७०.७६ टक्के मतदान झाले. यात हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंग याचे पुत्र विक्रमादित्य सिंग, भाजपचे माजी प्रमुख सतपाल सिंह सत्ती या महत्वाच्या नेत्यांसह ६८ मतदार संघातील ४१२ उमेदवार रिंगणात आहेत.
सन २०१७ साली झालेल्या निवडणुकीत भाजपने कांग्रा, मंडी, चंबा, कुल्लू, लाहौल आणि स्पिती या जिल्ह्यामध्ये दमदार कामगिरी बजावतानाच सत्तेची किल्ली आपल्याकडे घेतली होती. मात्र हमीरपूर, सोलन, शिमला जिल्ह्यात काँग्रेस पक्षाने मुसंडी मारताना अजून पडझड होऊ दिली नाही. भारतीय जनता पक्षाने ६८ पैकी ४४ जागी विजय साकाराला होता. काँग्रेसला २१ जागांवर समाधान मानावे लागले होते.
यावेळी मात्र, भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी निवडणुकीसाठी ताकदीचा वापर केला आहे. काँग्रेसने सत्तेवर येण्यासाठी जंगजंग पछाडले असून याला भाजपने देखील कामाद्वारे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी झालेले मतदान आणि ओपिनियन पोल अनुसार दोन्ही पक्षात सत्ता स्थापनेच्या जवळ जाणार आहेत, मात्र नक्की कोणता पक्ष सत्ता स्थापन करणार, हे आगामी काळात स्पष्ट होईल.