राहुलकुमार अवचट
यवत : दौंड तालुक्यातील जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत प्रस्तावित असलेल्या पाणी पुरवठा योजनांना लवकरच तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळणार आहे. अशी माहिती दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दिली आहे.
दौंड तालुक्यातील विविध गावांच्या पाणी पुरवठा योजनांच्या पाठपुराव्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची तर महसूल विभाग संबंधित विविध प्रश्नांच्या पाठपुराव्यासाठी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर यांची आमदार राहुल कुल यांनी मंत्रालयामध्ये भेट घेतली. त्यावेळी सचिव नितीन करीर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना लवकर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहे.
दौंड तालुक्यातील सुमारे ३३ महसुली गावातील पाणीपुरवठा योजना या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) व ६९ महसुली गावांच्या पाणीपुरवठा योजना या जल जीवन मिशन (JJM) अंतर्गत प्रस्तावित केलेल्या असून काही गावातील पाणी पुरवठा योजनांना तांत्रिक मान्यता मिळाली असून त्या प्रशासकीय मान्यतेसाठी प्रलंबित आहेत. त्यांना तातडीने मान्यता मिळावी. तेव्हा उर्वरीत गावांच्या पाणी पुरवठा योजनांना लवकर तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळावी. यासंदर्भात आमदार कुल आणि मुख्य सचिव नितीन करीर यांनी चर्चा झाली. या चर्चेत मुख्य सचिव नितीन करीर यांनी सकारात्मक भूमिका दर्शविली आहे.
दरम्यान, दौंडचे दिवंगत आमदार, स्वातंत्र्य सैनिक स्व. जगन्नाथ तात्याबा पाटसकर यांच्या कुटुंबियांसाठी सरकारी जागा देण्याचा प्रस्तावास मान्यता मिळावी, भविष्यातील वाढते नागरीकरण लक्षात घेता, यवत येथे सुस्सज पोलीस ठाणे उभारण्यासाठी जागा मिळावी. तसेच माजी सैनिक मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थेला सरकारी जागा मिळावी आदी मागण्या आमदार राहुल कुल यांनी केल्या आहेत.