सांगली : सांगली जिल्ह्यातील पडळकरवाडी येथील ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई कुंडलिक पडळकर यांना बिनविरोध सरपंचपद देण्याचा गावकऱयांनी निर्धार केला आहे. याबाबत नेते व प्रमुख कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
सरपंच पदाची निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असून २० डिसेंबरनंतर यावर शिक्कामोर्तब होणार आहे. आमदार पडळकरांच्या मातोश्री यांना लोकनियुक्त सरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्याबाबत पडळकरवाडीमध्ये गुरुवारी बैठक देखील पार पडली. या बिनविरोध निवडीसाठी पडळकर समर्थकांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. मात्र, सरपंच पद निवडणूक अर्ज दाखल करणे आणि माघार घेण्याच्या तारखेनंतरच आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्रीच्या सरपंच पदावर शिक्कामोर्तब होणार आहे.
आमदार गोपीचंद पडळकर हे सध्या विधान परिषदेचे आमदार आहेत. त्याबरोबरीने भाजपाचे स्टार प्रचारक देखील आहे. आमदार पडळकर यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकर हे सध्या जिल्हा परिषद सदस्य आहेत.