दीपक खिलारे
इंदापूर : ‘हर्षवर्धन नेहमी माझ डोक खातो’, असा आपुलकीने उल्लेख करून केंद्रीय गृह व सहकार मंत्री आमित शाह यांच्याकडून माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांचे विनोदी शैलीमध्ये कौतुक नुकतेच करण्यात आले आहे.
सहकारी साखर उद्योगाच्या मदतीसाठी नवी दिल्लीमध्ये केंद्रीय गृह व सहकार मंत्री आमित शाह यांच्याकडे भाजप नेते व राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा सतत पाठपुरावा चालु असतो. त्याचा संदर्भ घेऊन पुण्यामध्ये शनिवारी (ता.१८) आयोजित सहकार परिषदेमध्ये भाषणात अमित शाह यांनी हर्षवर्धन पाटील यांचे अशा विनोदी शैलीमध्ये कौतुक केले आहे.
यावेळी बोलताना अमित शहा म्हणाले कि, सहकारी साखर उद्योगासाठी एन.सी.डी.सी. कडून थेट महाराष्ट्र सरकार मार्फत कर्ज दिले जाईल, रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून अटींमध्ये शिथिल करून साखर उद्योगाला कर्ज दिले जाईल, तेल कंपन्यांकडून इथेनॉलचे पैसे कारखान्यांना कर्ज देणाऱ्या बँकांच्या खात्यात जमा केले जातील, त्यामुळे कारखान्यांना इथेनॉलपासून उत्पन्न मिळेल. तसेच इथेनॉल वरील जीएसटी १८ टक्के वरून ५ टक्के करण्यात आल्याने साखर उद्योगाला फायदा होणार आहे. असे शहा यांनी यावेळी सांगितले आहे.
दरम्यान, हर्षवर्धन पाटील हे इथेनॉल प्रकल्पांसाठी कर्ज मिळत नाही, एन.सी.डी.सी. कडून साखर उद्योगाला अटी शिथिल करून कर्ज मिळाले पाहिजे. आदी मागण्यांसाठी माझे डोके खातो, या शब्दात अमित शाह यांनी विनोदी शैलीमध्ये हर्षवर्धन पाटील यांची फिरकी घेत साखर उद्योगाला सर्व प्रकारची मदत केली जाईल असे स्पष्ट केले.
पुण्यातील सहकार परिषदेमध्ये अमित शाह यांनी हर्षवर्धन पाटील यांचा कौतुकास्पद असा उल्लेख केल्याने, हर्षवर्धन पाटील यांचे राज्याच्या साखर उद्योगातील महत्त्व अधोरेखित झाले आहे.