उरुळी कांचन (पुणे)- पुणे सोलापूर महामार्गावर हडपसर ( १५ नंबर) ते उरुळी कांचन या दरम्यान वाहतूकीच्या व रस्त्याच्या अनेक समस्या आहेत हे खरे आहे. या दरम्यानच्या टप्प्यात वहातुक कोंडी होऊ नये व सतत होणारे अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलीस खात्या सहीत सर्व संबंधित शासकीय विभागांना कडक सुचना देण्यात आल्या आहेत. या नंतरही वाहतूक सुरळीत न झाल्यास संबंधीत शासकीय खात्यां विरोधातील जनतेच्या आंदोलनाचे नेतृत्व मी स्वतः करील असा खणखणीत इशारा शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिला.
तसेच वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत ठेवण्या ऐवजी फक्त पावत्या फाडून पैसे गोळा करतात ही बाब अंत्यत लाजीरवाणी आहे. यामुळे वाहतूक पोलिसांनी यापुढील काळात वाहतूक नियमणाऐवजी वसुलीकडे लक्ष दिल्यास,वहातुक पोलिसांच्या विरोधात स्वतः रस्त्यावर उतरण्यास मागेपुढे पहाणार नाही असेही खासदार कोल्हे यांनी यावेळी स्पष्ठ केले.
पुणे सोलापूर महामार्गावर हडपसर ( १५ नंबर) ते उरुळी कांचन या दरम्यान लोणी काळभोर परिसरात मागिल पाच दिवसाच्या काळात दोन शाळकरी सख्ख्या बहिणी व एका युवकाचा अपघाती मृत्यू झाला आहे. या संदर्भात महामार्गाची पाहणी करण्यासाठी डॉ. अमोल कोल्हे आले होते. महामार्गावरील अपघात प्रवण ठिकाणांची पाहणी केल्या नंतर उरुळी कांचन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत कोल्हे यांनी वरील इशारा दिला.
यावेळी डॉ. अमोल कोल्हे यांच्या समवेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपसंचालक प्रशांत आवटी, पुणे शहर पोलिसांच्या वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती सनी काळभोर यांच्यासह पुर्व हवेलीमधील विविध गावांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, प्रत्येक व्यक्तीचा जीव महत्वाचा आहे. १५ नंबर ते उरुळी कांचन दरम्यान महामार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी पुणे शहर पोलीसांचा वाहतूक विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संबंधित सर्व शासकीय विभागांना सुचना दिल्या आहेत. अपघातांची संख्या कमी करण्याबाबतीत प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी या यंत्रणा काम करत आहेत.
रम्बलर स्ट्रीप, स्पीड ब्रेकर आदी उपाय करण्यात येणार आहेत. हे उपाय करताना जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, स्थानिक सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदींचे मत विचारात घेतले जाणार आहे. महामार्गावर स्पीडब्रेकर करताना विशेष परवानगी घ्यावी लागते या बाबतीत विचार सुरू आहे. अल्पवयीन मुलांनी वाहन चालवण्या संदर्भात जनजागृती करणे आवश्यक आहे.
डॉ. अमोल कोल्हे पुढे म्हणाले, पुणे अहमदनगर महामार्गाच्या धर्तीवर पुणे सोलापूर महामार्गावर एलेव्हेटेड सहा पदरी, दुमजली फ्लायओव्हर बांधण्या संदर्भात पुढील आठवड्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहे. या फ्लायओव्हर वरुन मेट्रो वाहतूक व लांब पल्ल्याची वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. अहमदनगर व नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यात यश मिळाले आहे.
आता सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुणे शहरा बाहेरुन जाणारा रिंगरोड लवकर सुरु व्हावा म्हणून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. महामार्गा लगत असलेले कुठलेही अतिक्रमण काढण्यासाठी कुठलाही राजकीय दबाव आला तरी आधिका-यांनी आपले काम प्रामाणिकपणे करावे. या संदर्भात आपण आधिका-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू.
वाहतूक पोलीसांबद्दलच्या तक्रारीबदद्ल बोलतांना कोल्हे म्हणाले, पुणे शहर पोलीसांच्या वाहतूक विभागा बद्दल ब-याच पत्रकार, विविध पक्षाचे पदाधिकारी, पत्रकार व गावोगावच्या नागरिकांच्याकडुन पोलिस केवळ वसुली करतात याबाबतच्या मोठ्या प्रमानात तक्रार आलेल्या आहेत. वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत ठेवण्या ऐवजी फक्त पावत्या फाडून पैसे गोळा करण्यावर भर देतात हा तक्रारीचा सुर आहे. या तक्रारीबद्दल त्यांच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या समवेत बोलले आहे.
आगामी काळात पोलीसांचा वाहतूक विभाग किंवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या आधिकारी व कर्मचारी वर्गाकडून आपल्या कामात हलगर्जीपणा झाल्यास त्यांच्या विरोधात नागरिकांकडून आयोजित करण्यात येणा-या आंदोलनाचे नेतृत्व माझ्याकडे असेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.