लोणी काळभोर, (पुणे) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा हे खरे भारतीय संस्कृतीचे रक्षक आहेत. या देशाला स्वच्छतेच्या मंत्राबरोबरच माणसात देव शोधावा असा संदेश त्यांनी दिला असल्याचे प्रतिपादन सिक्कीमचे माजी राज्यपाल व खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व एमआयटी आर्ट, डिझाइन अॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, राजबाग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मानवतेचे महान पुजारी तत्वज्ञ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी संत गाडगेबाबा महाराज यांच्या पुतळ्याची स्थापना व अनावरण करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष उल्हास पवार, अमरावती येथील अखिल भारतीय श्रीगुरूदेव सेवामंडळ गुरूकुंज आश्रमचे सरचिटणीस जनार्दन बोथे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारेचे अभ्यासक ज्ञानेश्वर रक्षक, ग्रामगीताचार्य, गुरूकुंज आश्रमचे अरविंद राठोड, नागपूर येथील कृषितज्ञ प्रा. डॉ. रमेश ठाकरे, थोर विचारवंत प्रा. रतनलाल सोनाग्रा व योगेंद्र मिश्रा एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. मंगेश कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, आदी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७५व्या पुण्यतिथी निमित्ताने पुतळयाला पुष्पार्पण करून आदरांजली वाहिली. तसेच, उल्हास पवार लिखित ‘ महात्मा गांधी आणि जग’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यापुढे बोलताना पाटील म्हणाले,“ या दोन्हीं संतांचा जन्म व मृत्यू अमरावतीत झाला. यांनी मानवतेचा व विश्व बंधुत्वाचा संदेश देऊन स्वच्छतेचे महत्व सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून जी २० साठी विदेशातून येणार्या पाहुण्यांना या विश्वशांती घुमटाला भेट देण्याची विनंती करणार आहे.
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ साधू संतांच्या या भूमीत दोन्हीं संतांनी संपूर्ण मानवजातीला सुखी होण्याचा संदेश दिला. स्वामी विवेकानंद यांच्या नुसार २१ व्या शतकात भारत माता ही विश्वगुरू म्हणून उदयास येईल. तसेच संपूर्ण जगाला सुख, समाधान आणि शांतीचा मार्ग दाखवेल.
उल्हास पवार म्हणाले,“ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांचा उल्लेख मृत्यूंजय म्हणून करावा. कारण त्यांचे विचार हे मानव जातीला तारणारे आहेत. करूणा, दया, क्षमा आणि शांती याचा खरा अर्थ जाणून त्याचा अभ्यास करावा.
डॉ. मंगेश कराड म्हणाले, संतांनी देशाला विचार दिला. त्यांच्यामुळे आम्ही विकास करू शकलो. संत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे महाराज यांनी अंधश्रद्धा निर्मूलन आणि ग्राम स्वच्छतेचा विचार दिला. राष्ट्रसंतांच्या विचाराने आपल्या गावात कार्य सुरू करावे.
त्यांच्या विचाराने गावाचा विकास आणि नावलोकिकात वाढ होईल. डॉ. एस.एन.पठाण यांनी प्रास्ताविक केले. गुरूदेव सेवा मंडळाचे प्रा. सुरेंद्र नावडे यांच्या मार्गदर्शनात खंजिरी भजनाचा कार्यक्रम झाला. प्रा. अतुल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ. मिलिंद पांडे यांनी आभार मानले.