मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिंदे गटाच्या समर्थक शितल म्हात्रे यांनी व्हिडीओ शेअर करताना म्हटलं की, “रात्रीचे १२.३०.. पश्चिम द्रुतगती महामार्गावर विलेपार्ले येथे एका तरुणाच्या गाडीला अचानक आग लागली. औरंगाबादहून मुंबईला येताना विमानतळावरून घरी जाताना भर पावसात खाली उतरुन मुख्यमंत्री शिंदेंनी संबंधित यंत्रणेला त्या तरुणाला मदत करण्याचे आदेश दिले. हे आहेत आपले मुख्यमंत्री…
मुख्यमंत्र्यांनी तरुणाची विचारपूस केली तेव्हाचा व्हिडीओ शिंदे गटाच्या समर्थक असणाऱ्या शितल म्हात्रे यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री शिंदे हे तरुणाची विचारपूस करत असल्याचं दिसतं.
एकनाथ शिंदे हे औरंगाबाद दौऱ्यावर गेले होते. तिथून काल मध्यरात्री ते मुंबईत आले. दरम्यान, मुख्यमंत्री मुंबईत परत येत असताना विलेपार्ले इथं त्यांच्यासमोरच बर्निंग कारचा थरार बघायला मिळाला. एका तरुणाच्या गाडीला आग लागल्याचा प्रकार दिसताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला गाड्यांचा ताफा थांबवला. त्यानंतर खाली उतरून तरुणाची विचारपूस करत त्याला मदतीचं आश्वासन दिलं.
तरुणाला त्याचं नाव विचारल्यानंतर मुख्यमंत्री आधार देतात. तरुणाला आधार देताना मुख्यमंत्री शिंदे त्याला, ‘घाबरू नको, जीव वाचला हे महत्त्वाचं आहे, आपण गाडी नवीन घेऊ. मी बोलतो’ असं म्हणतात. त्यानंतर तरुणाला रडू कोसळलं, तसंच मुख्यमंत्र्यांचे आभारही मानतो.
तरुणासोबत कोण आहे याचीही चौकशी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. प्रशासनाला त्याला मदत करण्याचे सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांनी तरुणाला गाडीच्या जवळ जाऊ नकोस असंही सांगतात.