सोलापूर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे सोलापुर जिल्हातील विश्वासु शिलेदार व मोहोळचे माजी आमदार राजन पाटील उर्फ मालक हे आपल्या दोन मुलांच्यासह तालुक्यातील लाखो समर्थकासह येत्या 2 ऑगष्ट रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत आहे. माजी आमदार राजन पाटील यांचे थोरले चिंरजीव विक्रांत पाटील उर्फ बाळराजे यांना भारतीय जनता पक्षाने विधानसभेचे आमदार करण्याचे आश्वासन दिल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादीचे संस्थापक व पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला समजला जाणारा सोलापुर जिल्हा मागिल पाच वर्षात भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला होऊ पहात आहे. सोलापूर जिल्ह्यातील अकरापैकी सात विधानसभा मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आहे. त्यातच आता ही मोठी बातमी समजत आहे. मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आपली दोन मुले आणि समर्थकांसह 2 ऑगष्ट रोजी सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला सोलापूरमध्ये मोठा झटका बसणार अशी चर्चा आहे.
भारतीय जनता पक्ष सोलापूर जिल्हावर मांड टाकण्याचा प्रयत्न करत असला तरी, मोहोळ तालुका मात्र माजी आमदार श्री पाटील पाठीशी उभा राहिल्याचे चित्र पस्तीस वर्षापासुन दिसुन येत आहे. मागच्या तीन निवडणुकीत श्री पाटील स्वतः उमेदवार नसतानांही, तीनही वेळा त्यांनी दिलेला उमेदवार बहमताने निवडुन आलेला आहे. यावरुनच मोहोळ मतदार संघावर त्यांची पकड किती घट्ट आहे हे दिसून येते. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाला मोहोळ विधानसभा मतदार संघात मुसंडी मारावयाची आहे. त्यातूनच मोहोळ विधानसभा मतदारसंघ जवळ करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्या दृष्टिकोनातून व्यूहरचनाही आखण्यात येत आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात होत असलेली मानसिक कुंचबना व दोन्ही मुलांचा भाजपाकडे होणारा कल यामुळे माजी आमदार राजन पाटील यांनी भाजपा मध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. याबाबत राजन पाटील यांनी जाहीररित्या प्रतिक्रिया दिलेली नसली तरी, त्यांचे मौनच भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याबाबत संकेत देत असल्याचे बोलले जात आहे.