पुणे : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम वाजत असून उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यात इच्छूक उमेदवार वंचित राहू नयेत यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ३ डिसेंबर पर्यंत अर्ज भरण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. या मागणीला निवडणूक आयोगाने सकारात्मक प्रतिसाद देताना २ डिसेंबर सायं ५. ३० पर्यंत ही ऑफलाईन अर्ज भरण्याची मुभा दिली आहे.
राज्यात आजच्या घडीला तब्बल ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. निवडणूकीत सर्व प्रकारचे उमेदवारी अर्ज ऑनलाईन प्रकारे भरण्यात येत आहे. सर्व्हर डाऊनमुळे अनेक इच्छूकांचे स्वप्न धुळीस मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळेच भाजपाच्या वतीने ऑफलाईन अर्ज भरण्याची मुदत एक दिवस वाढवून देण्याची मागणी करण्यात आली होती.
१८ नोव्हेंबर पासून उमेदवारी प्रक्रिया सुरु झाली असून १८ डिसेंबर रोजी मतदान तर २० डिसेंबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्जाची छाननी ५ डिसेंबर रोजी तर ७ डिसेंबरपर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत. तब्बल ७७५१ ग्रामपंचायतींचे सर्व सरपंच यावेळी थेट जनतेतून निवडून येणार आहेत.
या निवडणुकीतून आगामी निवडणुकींचा कल कदाचित स्पष्ट होऊ शकणार आहे. सध्या राज्यात शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार आहे. महाविकास आघाडीने देखील या निवडणुकीसाठी कंबर कसली असून यात अनेक छोटे मोठे पक्ष देखील आपले नशीब पडताळून पाहतात.