नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे नेते, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी आज (शुक्रवारी) पहाटे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (cbi) छापा टाकला आहे. ही छापेमारी दिल्लीच्या नव्या एक्साइज धोरणाशी संबंधित असल्याचा दावा केला जात आहे. सिसोदियांनी सीबीआय अधिकारी आपल्या घरी आल्याच्या बातमीला सिसोदियांनी यांनी दुजोरा दिला आहे. यावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व सिसोदिया यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
अरविंद केजरीवाल यांनी टि्वट करुन त्याला उत्तर दिले आहे. “ज्या दिवशी अमेरिकेच्या सर्वात मोठ्या NYT वृत्तपत्राच्या मुख्य पृष्ठावर दिल्लीच्या शिक्षण मॉडेलची प्रशंसा होऊन मनिष सिसोदियांचे छायाचित्र छापण्यात आले, त्याच दिवशी मनिष यांच्या घरी केंद्राने सीबीआय पाठवली. सीबीआयचे स्वागत आहे. पूर्ण सहकार्य केले जाईल. यापूर्वीच अनेक धाडी पडल्या. काहीच निघाले नाही. आताही काहीच निष्पन्न होणार नाही,” असे केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
सीबीआयच्या छापमारेनंतर सिसोदियांनी तीन टि्वट केलं आहेत.
1 – सिसोदिया म्हणाले -‘सीबीआय आली आहे. त्यांचे स्वागत आहे. आम्ही कट्टर प्रामाणिक आहोत. लाखो मुलांचे भविष्य निर्माण करत आहोत. पण दुर्दैवाने आपल्या देशात चांगले काम करणाऱ्याला नेहमीच परेशान केले जाते. यामुळे आजही आपला देश नंबर-1 बनला नाही.’
2 – ‘आम्ही सीबीआयचे स्वागत करतो. सत्य उजेडात यावे यासाठी आम्ही तपासात पूर्ण सहकार्य करू. आतापर्यंत माझ्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले. पण त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. यातही काहीच निघणार नाही. देशात दर्जेदार शिक्षण व्यवस्था उपलब्ध करवून देण्याचे माझे काम कुणालाही थांबवता येणार नाही.’
3 – ‘हे लोक दिल्लीतील शिक्षण व आरोग्याच्या शानदार कामामुळे परेशान झालेत. त्यामुळे त्यांनी ही चांगली कामे रोखण्यासाठी दिल्लीचे आरोग्य मंत्री व शिक्षण मंत्र्यांना पकडले आहे. आम्हा दोघांवरील आरोप निखालस खोटे असून, न्यायालयात सत्य उजेडात येईल,’ असे सिसोदिया म्हणाले.