मुंबई : कोरोना महामारीच्या संकटानंतर यंदा संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः मुंबई आणि ठाण्यात दहीहंडी उत्सव भव्यपणे साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ११ हून अधिक दहीहंडी उत्सवाच्या मंचावर हजेरी लावून शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना मागे टाकले.
दहीहंडी उत्सवानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यात आज शाब्दिक युद्ध पटले. ’50 थर लावून आम्ही कठिण हंडी फोडली’, या मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर आदित्य ठाकरेंनी जोरदार पलटवार केला. आदित्य म्हणाले की, त्यांनी (शिंदे गट) ५० थर लावले नाहीत तर, ५० खोके मिळवले आहेत… यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करत आदित्य म्हणाले की, भाजपला मुंबई म्हणजेच मलई दिसत आहे.
आमचे जे आमदार मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. त्यांचा विश्वासघात झाला आहे. कारण प्रत्यक्षात फक्त एकाच व्यक्तीने मलाई खाल्ली आहे. यासोबतच आज दहीहंडी उत्सवानिमित्त राजकीय वक्तव्य करण्याची इच्छा नसल्याचेही ठाकरेंनी स्पष्ट केले.
शिवसेनेच्यावतीने सुमारे ८ ते ९ दहीहंडी उत्सवात आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली. तर ९ हून अधिक ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावून गोविंदा पथकांना प्रोत्साहन दिले.
मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीही डझनभराहून अधिक दहीहंडी उत्सवात हजेरी लावली. त्यांच्या नेतृत्वाखाली आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार संपवण्याचा संकल्प करणारी दहिहंडी मुंबई भाजपातर्फे फोडण्यात आली. तरुणाईच्या जल्लोषात वरळीच्या ऐतिहासिक जांबोरी मैदानात आयोजित या दहीहंडी उत्सवात विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार राजहंस सिंह, उत्तर भारतीय महाराष्ट्र अध्यक्ष संजय पांडे, संजय उपाध्याय आयोजक संतोष पांडे आदी सहभागी झाले होते.