पुणे : एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे शिवसेनेची सत्ता तर गेलीच, पण त्यानंतरही सेनेवरील संकट काही कमी झालेले नाही. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे सध्या पक्ष वाचविण्यासाठी धडपडत आहेत. त्यांच्या गटाने निवडणूक आयोगाकडे जाऊन कॅव्हेट दाखल केले आहे. त्यात पक्षाच्या धनुष्यबाणाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय त्यांची बाजू ऐकून घेऊनच घ्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाने केली आहे.
शिवसेनेचे 55 आमदार असून त्यापैकी 40 आमदारांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. याशिवाय 19 लोकसभा खासदारांपैकी अनेक खासदार उद्धव यांची साथ सोडण्याची शक्यता आहे. इतकेच नव्हे, तर अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे गट निवडणूक आयोगाकडे जाऊन पक्ष आणि चिन्हावर दावा सांगू शकतो. ही परिस्थिती टाळण्यासाठी उद्धव ठाकरे आधीच सक्रिय झाले असून त्यांनी निवडणूक आयोगात कॅव्हेट दाखल केले आहे.
‘धनुष्यबाण या चिन्हावर शिंदे गट दावा करू शकतो. त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी ही खबरदारी घेत निवडणूक आयोगाशी संपर्क साधल्याचे बोलले जात आहे.