ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात शिंदे आणि ठाकरे गट पुन्हा एकमेकांना ‘भिडले’. ठाण्यात ठाकरे गटाचे संजय घाडीगावकर यांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आली होती , या बैठकीत ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे, केदार दिघे, तसेच युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.
त्यावेळी शिंदे गटाचे कार्यकर्ते त्याठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्याबरोबरीने ठाकरे गटाच्या दोन कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केल्याची माहिती देखील समोर आली आहे. यावेळी शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या आक्रमक झाल्या होत्या.
शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला. या हल्ल्यामध्ये एक जण जखमी झाला. या जखमी कार्यकर्त्याला ठाण्याचा सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
आलेल्या शिंदे गटातील काही कार्यकर्त्यांनी खासदार राजन विचारे यांच्यावर पाण्याची बाटली फेकल्याचे सांगितले जाते आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला असून यावर श्रीनगर पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांचे कार्यकर्ते आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ नाही. मुंबईसह वेगवेगळ्या भागात यापुर्वी देखील कार्यकर्ते भिडले होते. मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. अनेक पक्ष आपले शड्डू ठोकत असताना या दोन्ही गटातील संघर्ष पुन्हा एकदा उफाळी घेण्याची शक्यता आहे.