उरुळी कांचन, (पुणे) : खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी कृषीमंत्री अब्दुल सत्तर यांनी केलेल्या बेताल वक्तव्याबाबत उरुळी कांचन (ता. हवेली) येथील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून निषेध व्यक्त करत लोणी काळभोर पोलिसांकडे निवेदन देण्यात आले.
अब्दुल सत्तार हे मंत्रीपदावर आल्यापासून वारंवार असंसदीय भाषेचा वापर करून इतरांचा अपमान करीत आहेत. ते मंत्रीपदावर राहण्यास लायक नाहीत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, महिला व भगिनी यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. सत्तार यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी असलेले निवेदन लोणी काळभोर पोलिसांना देण्यात आले.
उरुळी कांचन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या (शहर) वतीने जाहीर निषेध करीत आहोत. तरी सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल करून राजीनामा घ्यावा अन्यथा उरुळी कांचन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष आबासाहेब कांचन, माजी पंचायत समिती सदस्य हेमलता बडेकर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष रामभाऊ तुपे, हवेली तालुका सरचिटणीस आप्पासाहेब डोंबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आप्पासाहेब वाघमोडे. सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब चौधरी, प्रतिक कोतवाल आदी उपस्थित होते. सदरचे निवेदन हे लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक देशमुख यांना देण्यात आले.