पुणे : शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत आणि आमदार संतोष बांगर यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. हि माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत हे भूम परंडा या मतदारसंघातून आमदार आहेत. सावंत हे सोलापूर जिल्हाचे संपर्कप्रमुख होते. त्यांना या पदावरुन हटवण्यात आले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांची हिंगोलीच्या जिल्हाप्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेच्या खासदारांची आज बैठक होणार आहे. या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीविषयीची भूमिका तसेच बंडखोरी आणि सध्याची परिस्थिती यावर चर्चा केली जाऊ शकते. या बैठकीच्या अगोदर शिवसेनेने बांगर आणि तानाजी सावंत यांच्याविरोधात केलेल्या कारवाईला मोठे महत्त्व आले आहे.
उद्धव ठाकरे तसेच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडून बंडखोर आमदारांना यापूर्वी अनेकवेळा परतण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र या प्रयत्नांना यश न आल्यामुळे आता शिवसेनेने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सावंत हेदेखील बंडखोर आमदारांसोबत गुवाहाटीमध्ये मुक्कामी होते. याच कारणामुळे तानाजी सावंत यांना पदावरुन हटवण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे