पुणे : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर टीका केली असून शिवसेनेचा हायकमांड दिल्लीत नसून मुंबईच्या मातोश्रीवर असल्याचा टोला लगावला आहे.
राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, लोकांना नवीन मुख्यमंत्र्यांकडून खूप आशा आहेत. कर्नाटक सीमाभागातून मराठी लोकांवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या येत आहेत. कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता असल्याने हा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मांडावा, अशी विनंती त्यांनी शिंदे यांना केली.
शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर राऊत म्हणाले की, शिवसेना हायकमांड मुंबईत आहे. शिवसेनेचे मुख्यमंत्री कधीच दिल्लीला जात नाहीत. याआधीही सेनेचे मुख्यमंत्री दिल्लीला कधीच गेले नव्हते. ते म्हणाले की, बेळगाव येथील स्थानिक शिष्टमंडळाने माझी भेट घेऊन तेथील परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले. महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखालील ठाकरे सरकार गेल्यानंतर हा त्रास सुरू झाल्याचे राऊत म्हणाले.