Sharad Pawar News : बारामती : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतेच अजित पवार यांच्याबाबत एक विधान केले होते. अजित पवार हे आमचे नेते आहेत. राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही, असे विधान केल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही अजित पवार हे आमचेच नेते असल्याचे म्हटले आहे. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेलीच नसल्याचा दावा देखील शरद पवार यांनी केला आहे. राजकीय धुरीणांनाही बुचकळ्यात पाडेल असे विधान शरद पवार यांनी केल्यामुळे राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय?
बारामती येथे पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार बोलत होते. अजित पवार आमचे नेते आहेत, या सुप्रिया सुळे यांच्या विधानावर मत विचारले असता, शरद पवार म्हणाले की, अजितदादा आमचे नेते आहेत, यात वादच नाही. देश पातळीवर पक्षातील एक वर्ग वेगळा झाला, तर फूट पडली असे म्हणता येते. पण तशी स्थिती येथे नाही. ( Sharad Pawar News) कोणी पक्ष सोडला, वेगळी भूमिका घेतली तर तसा निर्णय घेण्याचा लोकशाहीत त्यांना अधिकार आहे. त्यांनी वेगळा निर्णय घेतला म्हणजे फूट पडली असं म्हणता येत नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
आगामी लोकसभा निवडणुकीत देशात मोदीच येणार असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. तर राज्यात महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याबाबत शरद पवार म्हणाले की, या सर्व्हेचा बेस मला माहीत नाही. कोणत्या लोकांना विचारलं? किती जणांना विचारलं, हे देखील माहीत नाही. माझ्या माहितीनुसार, महाविकास आघाडीलाच सर्वाधिक जागा मिळणार आहेत.
शरद पवार यांचा आज सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात दौरा आहे. सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथे सकाळी पवारांची जाहीर सभा होणार आहे. ( Sharad Pawar News) तर संध्याकाळी कोल्हापूरच्या दसरा चौकात सभा होणार आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीडमध्ये सभा होणार आहे. याबाबत शरद पवार म्हणाले की, लोकशाहीत सभा घ्यायला अडचण नाही. लोक जाहीर सभा घेऊन भूमिका मांडत असतील तर त्याचा आनंद आहे. त्यामुळे जनतेला कळेल सत्य काय आहे.