Sharad Pawar News : मुंबई पावसाळी अधिवेशनापूर्वी अजित पवार गटाच्या मंत्र्यांची बैठक देवगिरी निवासस्थानी पार पडली. या बैठकीनंतर शरद पवार यांना भेटण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, आदिती तटकरे, मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, छगन भुजबळ राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला वाय. बी. चव्हाण सेंटरला पोहचले आहेत. राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठे धक्कातंत्र पाहायला मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा यानिमित्ताने होत आहे.(Sharad Pawar News)
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठे धक्कातंत्र.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी पक्षावरही दावा सांगितला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत उभी फूट पडलेली असतानाच आज नाट्यमयरित्या अजित पवार यांच्यासोबत राज्य मंत्रिमंडळात शपथ घेतलेले अनेक मंत्री शरद पवार यांची भेट घेण्यासाठी गेल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादीतील दोन गटांच्या मनोमिलनासाठी पुन्हा एकदा प्रयत्न सुरू झाले आहेत का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.(Sharad Pawar News)
दरम्यान, राष्ट्रवादीतील फुटीनंतर विरोधी बाकावरील जवळपास ४० आमदार सत्ताधाऱ्यांना सामील झाले आहेत. राज्यातील जातीय दंगली, शेतकऱ्यांवर ओढवलेले दुबार पेरणीचे संकट, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आदी अनेक मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची संधी होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे विरोधकांचे संख्याबळ घटले आहे. या पार्श्वभूमीवर अधिवेशनात विरोधकांची कसोटी लागण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांमध्ये चर्चा सुरू झाल्याने भुवया उंचावल्या आहेत.(Sharad Pawar News)
दरम्यान, पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. मात्र, अद्याप विरोधी पक्षनेता कोण, यावर मविआतील घटकपक्षांचे एकमत झाल्याचे दिसत नाही. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनीच याबाबत माहिती दिली आहे.(Sharad Pawar News)
अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर पहिल्यांदाच विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. हे पावसाळी अधिवेशन विरोधक गाजवणार की सत्ताधारी, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.