अजित जगताप
Satara News : सातारा : प्रसिद्ध नाटककार दादू इंदूरीकर यांनी गाढवाचं लग्न हे नाट्य अजरामर केले. त्याद्वारे गाढवाला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्याचीच आठवण सातारा येथील शासकीय विश्रामगृहात पहावयास मिळाली असून या विश्रामगृहाचा गाढवांनाही लळा लागला असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.
याबाबत माहिती अशी, सातारा येथील शासकीय विश्रामगृहाला 60 वर्षे पूर्ण झाली आहेत. पूर्वी या विश्रामगृहाला अती महत्त्वाची व्यक्ती, प्रतिष्ठीत लोकप्रतिनिधी, अधिकारी वर्ग यांचा वावर होता. त्यांच्या बंदोबस्तासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असायची. अलिकडच्या काळामध्ये विश्रामगृहाचा वापर न करणारा आळशी, असे त्याचे स्वरुप झालेले आहे. गल्लीत ज्याला काळे कुत्रे ओळखत नाही, असे राष्ट्रीय अध्यक्षसुद्धा विश्रामगृहाचा कक्ष उघडण्याचा आदेश करतो. (Satara News) बिचारा कर्मचारीसुद्धा भीतीपोटी आदेशाचे पालन करतो. आतातर कष्टाळू व प्रामाणिक गाढवे सुद्धा कष्ट केल्यानंतर पोटासाठी विश्रामगृहाच्या सभोवती भ्रमण करतात. परंतू काही मोकाट गाढवे सुद्धा या विश्रामगृहात वामकुक्षीसाठी येत असल्याचे उघड झाले आहे.
पडीक कार्यकर्त्यांकडून विश्रामगृहाचा बिनबोभाट वापर
खरेतर सार्वजनिक बांधकाम विभागाने शासकीय विश्रामगृहाचा वापर करण्यासाठी कडक नियमावलीचे फलक विश्रामगृहात लावलेले आहेत. त्यानुसार शासकीय बैठका वगळता इतरांना या आवारात बैठक घेण्याची परवानगी नसते. पूर्व परवानगीशिवाय कोणालाही विश्रामगृहाचा वापर करता येत नाही. आगावू आरक्षण केल्यानंतरच विश्रामगृह दिले जाते. सध्या या विश्रामगृहात अनेक पदे रिक्त असल्याने कोणी वालीच नाही.(Satara News) त्यामुळे काही महाभाग हे पडीक कार्यकर्ते म्हणून विश्रामगृहाचा बिनबोभाट वापर करु लागले आहेत. काहींना येथे असणारे फुकटचे वायफाय खुणावते. त्यामुळे शासकीय विश्रामगृह म्हणजे सर्वांचीच मेव्हणी झाली आहे. याचा अंदाज आल्याने गाढवे सुद्धा आता शेजारील बांधकाला लागणारे साहित्य टाकल्यानंतर विश्रामगृहाचा आसरा घेवू लागली आहेत. जणू काही या विश्रामगृहाचा गाढवांनासुद्धा लळा लागल्याचे दिसून आले आहे.
वरिष्ठ अधिकार्यांनी अगोदर येथे सदोदित पडीक असणार्या दोन पायांच्या गाढवांचा बंदोबस्त करावा, नंतर मुक्या व कष्टाळू जनावराबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी होवू लागली आहे.
सातारा शासकीय विश्रामगृहात राजकीय पक्ष व संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात येते. काही जण तर थेट पत्रकार परिषद घेतात. कारण, पत्रकारांना कोणी अडवत नाहीत. याचाच लाभ घेण्याची वृत्ती वाढली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Satara News : साताऱ्यात मांसाहारी जेवणातून 23 जणांना विषबाधा, एकाचा मृत्यू
Satara News : आनेवाडी नजिक विठाई बस पेटल्याने अनेक प्रश्नांचा निघाला धूर
Satara News : रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दलित अन्याय विरोधात जनआक्रोश आंदोलनाची तयारी