जीवन सोनवणे
खंडाळा, ता.२० : यशवंत सेनेचे (कै) बी. के. कोकरे यांनी धनगर आरक्षणाची ज्योत खंडाळा घाटात पेटवली. या ज्योतीचे वणव्यात रुपांतर करण्याचा निर्णय धनगर समाजबांधवांनी घेतला आहे. एस.टी. प्रवर्गात सामावून घेण्यासाठी आज (ता. २०) पारगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे महाराष्ट्रातील धनगर बांधवांनी ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. या वेळी धनगर समाजबांधव आपल्या मेंढरांसह रस्त्यावर उतरले होते. येत्या दहा दिवसांत निर्णय न झाल्यास, उजनी धरणात जलसमाधी घेणार असल्याचे समाजबांधवांनी स्पष्ट केले.
चौंडी येथील राज्यव्यापी बैठकीत खंडाळा या ठिकाणी ‘रास्ता रोको’ करण्याचा निर्णय घेण्यात आला. बारा दिवसांपासून चौंडीत उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांना बळ देण्यासाठी महाराष्ट्रातील धनगर बांधव एकवटले आहेत. यासाठी रविवारी धनगर समाजातील सर्व आजी, माजी आमदार व सर्व संघटनांच्या पदाधिकार्यांची राज्यव्यापी बैठक झाली. त्यात आंदोलनाची पुढील दिशा ठरविली गेली.
खंडाळा येथील पारगाव याठिकाणी आज धनगर समाजाने आरक्षणासाठी पुणे-सातारा महामार्गावर ‘रास्ता रोको’ केले. या वेळी धनगर समाजाची एस.टी. आरक्षणाची अंमलबजावणी त्वरीत व्हावी, तसेच महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे त्वरीत शिफारस करावी व एस.टी. प्रमाणपत्र त्वरीत मिळावे, मेंढपाळांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी शासनाने मेंढपाळांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना द्यावा, धनगर समाजातील मेंढपाळांना चरण्यासाठी वने आरक्षित करून, पास उपलब्ध करून देण्यात यावा.
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळाला किती निधी देण्यात आला व आतापर्यंत मेंढपाळ बांधवांसाठी किती मदत केली, याचे तपशील मिळावेत. वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत नागरी बँकांचा समावेश करावा. प्रत्येक जातवार महाराष्ट्र सरकारने एस.सी., एस.टी. वर्गासाठी बाटी, मराठा समाजासाठी सारथी आहे, ओ.बी.सी.साठी महाज्योती, बंजारा समाजासाठी नगरा महामंडळ आहे, त्याच धर्तीवर धनगर समाजाच्या शैक्षणिक व उद्योगधंद्यांसाठी महामंडळ स्थापन करावे, आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.
सोलापूर जिल्ह्यामध्ये निवेदन देण्यासाठी गेलेल्या बांधवांनी धनगर समाजाच्या प्रथेनुसार भंडारा उधळला म्हणून अंगरक्षक व काही गांवगुंडांकडून शेखर बंगाळे व चंद्रशेखर पाटील या धनगर बांधवांना अमानुष मारहाण झाली. त्या मारेकऱ्यांवर गुन्हा नोंद होऊन त्यांना तत्काळ अटक करून, संबंधित अंगरक्षकांचे निलंबन करावे. महाराष्ट्रातील अती दूर्गम डोंगरी भागातील मुख्यत्वे सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, पुणे या जिल्ह्यातील रस्ते, आरोग्य, पाणी, शाळा या सुविधांपासून समाजबांधव वंचित असून, त्यांच्या नावावर आजही घरे व जमिनी नाहीत. वनविभागाचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
महाराष्ट्र शासनाने याची दखल घेऊन, जे पिढ्यानपिढ्या त्याठिकाणी वास्तव्य करीत आहेत, त्यांच्या नावावर जमिनी व घरे त्वरीत करावीत, अशा विविध मागण्या घेऊन आज धनगर समाजाच्या वतीने पारगाव खंडाळा याठिकाणी आंदोलन करण्यात आले. या वेळी सातारा पोलीस प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
खंडाळा येथील छत्रपती शिवाजी चौक ते खंडाळा बस स्थानक, पुणे-सातारा महामार्गापर्यंत मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, येळकोट येळकोट जय मल्हार, कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही… अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता. आमचा एक उपोषण करणारा सिंह मरणाच्या दारात आहे. हा लढा आजच्यापुरता नाही. धनगर समाजाच्या हाती काहीतरी पडल्याशिवाय माघार घेणार नाही. दोन दिवस वाट बघू, आरक्षणाचा तिढा सुटला नाही, तर धनगर बांधव वणवा पेटविल्याशिवाय रहाणार नाहीत. समाज बांधवांनी आजचा संदेश प्रत्येक गावागावांत घेऊन जावा आणि आंदोलनाचा लढा व्यापक करावा, असे आवाहन या वेळी आंदोलकांनी केले.
दरम्यान, आंदोलन स्थगित केल्यानंतर देखील समाज बांधवांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. काही आंदोलकांनी तर वाहने सोडल्यानंतर वाहनाच्या समोर झेप घेत निर्णय मान्य नाही, अशा भावना व्यक्त केल्या. आंदोलनात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. खंबाटकी घाट ते शिवापूर टोल नाक्यापर्यंत वाहनांच्या रांगा पाहायला मिळाल्या. येत्या दहा दिवसांत निर्णय न झाल्यास उजनी धरणात समाजाच्या वतीने जलसमाधी घेणार असल्याचे स्पष्ट केले. या वेळी मोठ्या प्रमाणात धनगर समाजासह राज्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. खंडाळा तहसीलदार अजित पाटील यांच्या निवेदनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
पोलिसांची यशस्वी मध्यस्थी ; समझोता करत पुणे-बंगलोर महामार्ग केला खुला
धनगर समाजाला अनुसुचित जमाती प्रर्वगात आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आज पुणे-बंगलोर महामार्ग दीड तास अडविण्यात आला. आंदोलनादरम्यान आंदोलकांनी रस्त्यावर धिंगाणा घालत गाड्या अडविल्या. पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस यांनी लक्ष घालत यशस्वी मध्यस्थी केली. यानंतर सातारा बाजूकडे ही वाहतूक सुरू होणार म्हणून, काही आंदोलक रस्त्यावरच झोपले. मात्र, पोलिसांनी समजूत काढत या आंदोलकांनाही बाजूला केले. या वेळी आंदोलकांनी पोलिसांना जाब विचारला. मात्र, आंदोलक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. शेवटी पोलिसांनी यशस्वी मध्यस्थी करत महामार्ग खुला केला. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वारांनी पुढे जाण्याची संधी मिळताच पळ काढला. या दरम्यान सातारा दिशेकडील वाहतूकही सुरळीत झाली.