Satara News : सातारा : राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही… अजित पवार हे आमचे नेते आहेत, असं विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज सकाळी केले होते. या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. दरम्यान, या वक्तव्याला काही तास उलटत नाहीच, तोच अजित पवार आमचे नेते आहेत, असं विधान मी केलंच नाही, असा दावा शरद पवार यांनी केला आहे. अजित पवार यांना पक्षात पुन्हा संधी नसल्याचंही शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकारामुळे राष्ट्रवादीची नेमकी खेळी काय आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
त्यांना पक्षात पुन्हा संधी नाही…
सुप्रिया सुळे यांनी प्रथम पक्षात फूट पडलेली नाही, अजित पवार आमचेच नेते आहेत, असे विधआन केले होते. त्यानंतर शरद पवार यांनी त्यांचीच री ओढत अजित पवार आमचे नेते असल्याचे विधान केले. यामुळे भल्याभल्यांनी आश्चर्य व्यक्त केले. (Satara News) पक्षात नेमकं चाललंय काय, अशी प्रतिक्रीया देखील व्यक्त झाली. या विधानानंतर अवघ्या पाच तासांत शरद पवार यांनी घुमजाव केलं आहे. अजित पवार आमचे नेते… असं मी म्हटलं नाही. सुप्रिया असं म्हणू शकते. मी नाही, असं शरद पवार म्हणाले.
राष्ट्रवादीत अजित पवार यांना पुन्हा संधी देणार का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारला असता, पवार म्हणाले की, एकदा एक चूक केली आणि त्यानंतर दुरूस्ती केली, तर आपण एक संधी देऊ शकतो. एकदा पहाटेचा शपथविधी झाला होता. त्यावेळी आम्ही निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा या मार्गाने जाणार नसल्याचे कबूल केले होते. त्यामुळे त्यांना संधी दिली होती.(Satara News) आता दुसऱ्या चुकीला संधी मिळणार नाही, असे सांगत शरद पवार यांनी अजित पवार यांचे राष्ट्रवादीतील परतीचे दोर कायमचे कापले गेल्याचे स्पष्ट केले. तुम्ही आमच्या पक्षात असाल आणि तुम्ही काही चुकीची भूमिका घेतली आणि मी तुमच्यावर कारवाई केली याचा अर्थ ती पक्षातील फूट नाही, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. विकासाबाबत प्रश्न विचारा, मी त्याचे उत्तर नक्कीच देईन, असे देखील अजित पवार म्हणाले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Satara News : साताऱ्यातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना थेट पाकिस्तानातून धमकी
Satara News : आयुर्वेदिक काढा पिऊन ते झोपी गेले, पुन्हा कधीच न उठण्यासाठी…