अजित जगताप
Satara News | वडुज : खटावच्या मातीतून हायवे जात आहे. दुष्काळ वेगाने हटत आहे. ८० टक्के शेतीला पाणी मिळणार असून दहा वर्षात माण- खटावला दुष्काळ म्हणण्याची हिंमत कोणाची होणार नाही, असे मत भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष तथा माण- खटावचे आमदार जयकुमार गोरे व्यक्त केले.वडूज ता. खटाव येथे झालेल्या विविध विकास कामांच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
या वेळी माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, अनिल माळी, नगराध्यक्ष मनीषा काळे, ज्येष्ठ शिक्षण तज्ञ दादासाहेब गोडसे, विश्वासराव काळे, परेश जाधव, धनंजय चव्हाण, प्रदीप शेटे, नगरसेवक- नगरसेविका आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्व यंत्रणा मदत करीत असून संघर्षातून म्हसवड एम.आय.डी.सी. उभी राहिलेली आहे. पंचवीस हजार युवकांना काम मिळणार आहे. खटाव च्या मातीतून ५४ हजार कोटी रुपये खर्चाचा महामार्ग जाणारा असून जमिनीच्या किमती वाढणार आहेत. जिहे- कठापुर योजनेतून पाणी मिळाले असून आता तर टेंभूचा सहावा टप्पा मंजूर झाल्याने पुढील महिन्यात सुधारित प्रशासकीय मान्यता व दोन महिन्याने निविदा काढण्यात येणार आहे.
त्यामुळे दुष्काळी भागात ८० टक्के शेतीला पाणी मिळणार आहे. विकासाचे दालने उभी राहत असून व्यापारी व शेतकरी खुश आहेत. शाश्वत पाणी आल्यामुळे नवीन व्यवसाय उभा राहत आहे. मराठी मुलं धाडस करीत आहेत. शेतकऱ्यांच्या खिशात पैसा येणार आहे. असे स्पष्ट करून आमदार गोरे म्हणाले, सध्या विकास कामांमध्ये सर्वांचे सहकार्य लाभत आहे.
पूर्वी दुष्काळी भाग असल्याने लोकांना स्थलांतराशिवाय पर्याय नव्हता. परंतु ,अलीकडच्या काळात केंद्र व राज्य सरकार मधून रखडलेल्या योजनांना गती मिळत आहे. असेही त्यांनी सांगितले.