ठाणे : “पोलिसांनी माझ्या विरोधात ७२ तासांत दोन गुन्हे खोटे गुन्हे दाखल केले आणि तेही ३५४… मी या पोलिसी अत्याचाराविरुद्ध लढणार. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे. लोकशाहीची हत्या… उघड्या डोळयांनी नाही बघू शकत….” हे ट्वीट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंब्रा – कळवा येथील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खळबळ उडवून दिली आहे.
पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही ????३५४ ,.,
मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार … मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे,,. लोकशाहीची हत्या .. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 14, 2022
काल आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात एका महिलेने मुंब्रा पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल करून त्यांच्या विरोधात ३५४ अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे. त्यामुळे केवळ ७२ तासातच आव्हाड यांच्यावर दाखल करण्यात आलेला हा दुसरा गुन्हा ठरला.
यापूर्वी ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये हर हर महादेव चित्रपटाचा खेळ बंद पडल्या प्रकरणी आव्हाड व त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हयाची नोंद करण्यात आली होती. या प्रकरणात न्यायालयाने त्यांना १५ हजारांच्या कॅशबॉण्डवर जामीन मंजूर केला होता.
मात्र, काल पुन्हा विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याने आज सकाळीच जितेंद्र आव्हाड यांनी हे ट्विट करत खळबळ उडवून दिली.
काल रविवारी १३ नोव्हेंबर रोजी कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा -खाडी पुलाचे उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित रहाताना एका ४० वर्षीय महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत बाजूला केल्याचा दावा करण्यात आला. यानुसार सदर महिलेने याची तक्रार स्थानिक पोलीस अधिकाऱ्याकडे केली असता पोलिसांनी महिलेला तक्रार दाखल करण्याचे सांगितले. त्यानुसार सदर महिलेने जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तक्रार केली.
यानुसारच पोलिसांनी आव्हाड यांच्या विरोधात भादवि कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल केला.