राजस्थान : सोनिया गांधी यांनी गुजरातच्या निवडणुकप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘मौत का सौदागर’ असे म्हटले होते. त्याचा परिणाम सर्वांना माहिती होता. तोच परिणाम उत्तरेकडील तिन्ही राज्यांच्या निकालांमध्ये दिसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. काँग्रेसच्या हातून राजस्थान गेले याला राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेला पनौती हल्ला हे देखील असल्याचे तिन्ही राज्यांचे निकाल दर्शवत आहेत.
राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये राहुल गांधी यांनी केलेली वैयक्तिक टिपण्णी भोवल्याची चर्चा होत आहे. राहुल यांनी तीच चूक केली जी सोनिया गांधी यांनी गुजरातमध्ये केली होती. पुन्हा एकदा राहुल गांधी मोदींची ताकद ओळखण्यात चुकल्याचेही बोलले जात आहे.
प्रचारादरम्यान, राहुल गांधी यांनी एका सभेत वर्ल्डकपमध्ये भारताची हार आणि मोदींची स्टेडिअममध्ये उपस्थिती हा मुद्दा देखील छेडला होता. टीम इंडिया आरामात वर्ल्ड कप जिंकली होती. तिथे पनौतीने हरविले, टीव्हीवाले हे सांगणार नाहीत, परंतु जनतेला माहिती आहे, असेही राहुल गांधी म्हणाले होते. मात्र, अशोक गहलोत यांनी कामाच्या जोरावर प्रचार केला होता. सोनियांच्या टीकेनंतर काँग्रेस गुजरातमध्ये पिछाडीवर गेली, तोच परिणाम राहुल यांच्या वक्तव्याचा परिणाम राजस्थानमध्ये दिसला. यामुळे मोदींवर वैयक्तिक हल्ला अंगलट आल्याचे समोर येत आहे.
दरम्यान, कर्नाटकमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने मोदींवर हल्ला करणे टाळले होते, त्याचा फायदाही त्यांना मिळाला होता. यावरून येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने यापासून धडा घ्यायला हवा, असा दावा राजकीय तज्ज्ञांनी केला आहे.