Punw News : पुणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत सत्ताधारी भाजप-शिवसेनेशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या इतर आठ नेत्यांनीदेखील मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्याच्या राजकारणाची समीकरणे बदलताना दिसून येत आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील बदललेल्या सत्तासमीकरणाचा परिणाम आगामी मंत्रिमंडळ विस्तारातही दिसून येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. मंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये पुणे आणि पिंपरीसह जिल्ह्यातील अनेक आमदार उत्सुक आहेत. आगामी मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष ठेवून इच्छुक नेते, आमदारांनी गाठीभेटी घेण्यास सुरूवात केली आहे. आता भाजपने धक्कातंत्राचा अवलंब केल्यास, कोणाच्या गळ्यात राज्यमंत्रीपदाची माळ पडेल, हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्या सत्तेतील सहभागामुळे त्यांच्या समर्थकांना देखील मंत्रिमंडळ विस्तारात राज्यमंत्रीपद मिळेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. (Pune News) पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील मंत्री होण्यास इच्छुक असलेल्या आमदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात पुणे जिल्ह्याला नेमके किती मंत्री मिळणार, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
भेटीगाठींना वेग; हे आहेत इच्छुक…!
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांची निवडणूक येऊ घातली आहे. (Pune News) त्यामुळे या दोन शहरांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा होत आहे. मंत्रीमंडळ विस्तार देखील येत्या काही दिवसांतच होणार असल्याने, आमदारांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. यातच भाजप नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा वापर करणार, की पुणे जिल्ह्याच्या पदरात जास्त मंत्रीपदे टाकणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
पुण्यातील मंत्रीपदाचे दावेदार कोण?
– पर्वती विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेल्या माधुरी मिसाळ यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.
– खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या नावाचा मंत्रीपदासाठी विचार होऊ शकतो, अशी शक्यता आहे.
– शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार आणि फडणवीस यांचे समर्थक सिद्धार्थ शिरोळे यांच्या नावाची देखील चर्चा आहे.
– भाजपने धक्कातंत्र अवलंबल्यास जातीय समीकरणे जुळविण्यासाठी सुनील कांबळे यांच्या नावाचाही विचार होई शकतो.
पिंपरीतील मंत्रीपदाचे दावेदार कोण?
– भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर महापालिकेत पुन्हा भाजपाची एकहाती सत्ता आणणे हे आव्हानात्मक असणार आहे.(Pune News) त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लांडगे यांना ताकत देत राज्यमंत्री करू शकतात अशी चर्चा आहे.
– राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक असल्यामुळे निष्ठेचे फळ म्हणून त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात येणारअसल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे.
पुणे जिल्ह्यातील मंत्रीपदासाठी इच्छुक
– दौंडचे आमदार राहुल कुल आणि इंदापूरचे आमदार दत्ता भरणेही मंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये आहेत.
आता या सर्व इच्छुकांच्या मांदियाळीतून मंत्रीपदापर्यंत कोणाची मजल पोहोचणार, हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :