(Prakash Ambedkar )मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार या चर्चेने राजकारण चांगलेच पेटले होते. अखेर अजित पवारांनी माध्यमांना सामोरे जात जीवात जीव असे पर्यंत राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे सांगितले. त्यानंतर या चर्चा थांबतील असे वाटले होते. परंतू त्यानंतर ही चर्चा सुरु आहे, त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणारच असल्याचा पुन्हा एकदा दावा केला आहे.
येत्या १५ दिवसांत राज्याच्या राजकारणात २ मोठे बॉम्बस्फोट होणार असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. अजित पवार भाजपात प्रवेश करणार या चर्चांवर त्यांनी हे विधान केले होते. मात्र अजित पवारांनी मी राष्ट्रवादीतच राहणार असल्याचा खुलासा केला. त्यानंतर पत्रकारांनी प्रकाश आंबेडकरांना प्रश्न विचारला त्यावर मी अजूनही माझ्या विधानावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता नेमके राज्याच्या राजकारणात कोणता भूकंप होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
मोठा भूकंप ज्यावेळी होतो तेव्हा त्याचे छोटे छोटे संकेत दिसायला लागतात. एक भूकंप होता होता थांबला असं माध्यमांनी म्हटलंय. मी सध्या भाष्य करणार नाही. माझे जे विधान आहे राज्यात २ भूकंप होतील त्यावर मी कायम आहे. सगळेच सांगितले तर उत्सुकता जाते. त्यामुळे मी सांगत नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कोर्टाला कुणाला अपात्र करण्याचा अधिकार नाही………..
सुप्रीम कोर्टाचा निकाल आला तरी कोर्टाला कुणाला अपात्र करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे निकालातून अपात्र होईल असं वाटत नाही. अपात्रतेची जी कार्यवाही होती. विधानसभा उपाध्यक्षांच्या कारवाईवर स्थगिती होती ती उठवली जाईल असं वाटते. राज्यपाल, विधिमंडळ यात कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही. राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयावर कोर्ट भाष्य करणार नाही. राज्यपालांचा निर्णय बदलला जाईल असं वाटत नाही कारण घटना होऊन गेली आहे. उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीआधीच राजीनामा दिला होता. राज्यपालांचे आदेश मागे घेण्याबाबत घटनात्मक बंधन आहेत. विधानसभा उपाध्यक्षांच्या कारवाईला स्थगिती दिली होती ते उठवला जाईल असा अंदाज प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला.