Politics मुंबई : मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी करू अजित पवार गटाने मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सर्व आठ मंत्र्यांसह आज अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. (Politics) प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित मंत्र्यांनी शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले. (Politics)
या वेळी अजित दादा गटाच्या मंत्र्यांनी शरद पवार यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या नेत्यांनी शरद पवार यांना विनंती केली. पण शरद पवार यांनी त्यावर काहीच भाष्य केलं नाही. यावेळी सर्वच मंत्र्यांनी शरद पवार यांच्या पाया पडून दर्शन घेतले. आम्ही चुकलो असं सांगत माफीही मागितल्याची माहिती समोर आली आहे.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून प्रारंभ होत आहे. तत्पूर्वी आदल्या दिवशीच दादा गटाच्या सगळ्या नेत्यांनी शरद पवार यांची वाय बी चव्हाण सेंटर येथे जाऊन भेट घेतली. सगळ्या मंत्र्यांनी पुन्हा शरद पवार यांना भाजपला पाठिंबा देण्याविषयी गळ घातली. प्रफुल्ल पटेल, अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, नरहरी झिरवळ आदी नेत्यांनी पवारांचं मन वळविण्याचं प्रयत्न केला.
या भेटीविषयी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, या आमदारांनी शरद पवार यांना भेटणे ही अनपेक्षित घटना आहे. त्यावर भाष्य करणं योग्य नाही. शरद पवार यांच्यासोबत आम्ही चर्चा करू. ते अचानक भेटले आहेत. त्यातून काय उद्देश आहे. हे आज सांगणं अवघड आहे. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. खंत व्यक्त केली. तुम्ही मार्गदर्शन करावं असं म्हणाले. गुंता सोडवण्यास सांगितले. पण शरद पवार यांनी भाष्य केलं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केले.
प्रफुल पटेल म्हणाले की, आदरणीय शरद पवार यांना विनंती केली, त्यांच्यासाठी आमच्या मनात आदर आहेच, पण राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध कसा राहू शकतो, याचा विचार करावा, तसेच येणाऱ्या काळातील राजकारणाविषयी मार्गदर्शन करावं, त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं. पण आमच्या प्रस्तावावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही, असं प्रफुल पटेल यांनी सांगितलं.
दरम्यान, अर्ध्या तासांहून अधिक वेळ ही बैठक सुरु होती. दादा गटाने दिलेल्या प्रस्तावावर पवार यांनी उत्तर दिले नाही. भाजपबरोबर जायचं नाही, हे आधीही शरद पवार यांनी दादांच्या समर्थक आमदारांना सांगितलं होतं. आजही कोणतंच उत्तर न दिल्यामुळे दादा गटाचा प्रस्ताव शरद पवार यांनी नाकारल्याची चर्चा होत आहे.