Politics News पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसला मतं द्याल, तर शरद पवारांची मुलगी सुप्रिया सुळे यांचे भले होईल, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता. या आरोपाला आज शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. (Politics News) निवडणूक लढवताना पहिल्यावेळी पूर्वपुण्याई उपयोगी पडते. परंतु माझी मुलगी स्वकर्तृत्वाने तीनवेळा निवडून आली आहे. संसदरत्न म्हणून तिला उच्च दर्जाचा क्रमांक आहे. तिला आठवेळा पुरस्कार मिळाला. स्वत:चं कर्तृत्व असल्याशिवाय जनता वारंवार निवडून देत नाही. मोदींनी अशी बेताल वक्तव्य करणे हे अशोभणीय आहे, असे शरद पवार म्हणाले. (Politics News)
पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले की, मी पंतप्रधानांवर कधीही व्यक्तीगत टीका करणार नाही. कारण देशाच्या उच्चपदावर विराजमान असलेल्या व्यक्तिचा सन्मान ठेवला पाहिजे. पण एवढंच सांगेन की संसदेच्या सदस्याबद्दल असं मत व्यक्त करणं योग्य नाही.
शरद पवार यांनी महिला आणि मुली यांच्यावरील हल्ल्याच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली. मी महाराष्ट्रातील काही ठिकाणांची अधिकृत माहिती सरकारकडून मिळवली आहे. मला सर्व महापालिकांची माहिती मिळाली नाही. पण पुणे, ठाणे, मुंबई आणि सोलापूरची माहिती मिळाली. २३ जानेवारी ते २३ मे या कालावधीत पुण्यातून ९३७ मुली अथवा महिला या बेपत्ता आहेत. ठाणेमधून ७२१ बेपत्ता आहेत. मुंबईतून ७३८ आणि सोलापूर ६२ बेपत्ता आहेत. हा आकडा २४५८ आहेत.
बुलढाणा, धुळे, पुणे ग्रामीण, वाशिंद, अमरावती, जळगाव, भंडारा, रत्नागिरी आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये ग्रामीण एकूण ४४३१ मुली-महिला या बेपत्ता आहेत. दीड वर्षाच्या काळात बेपत्ता झालेल्या महिलांची संख्या एकूण ६८८९ आहे. एवढ्या मुली-महिला बेपत्ता होतात, ही शरमेची बाब आहे. गृहमंत्र्यांनी इतर वक्तव्य करण्यापेक्षा बेपत्ता महिला आणि मुलींना शोधलं पाहिजे, अशा शब्दांत पवार यांनी गृहमंत्र्यांना सुनावले.
शिखर बँकेबद्दल मोदींनी केलेल्या वक्तव्यावर देखील पवार यांनी भाष्य केले. शिखर बँक सोडा, मी कोणत्याच इतर बँकेतून कर्ज घेतलं नाही. शिखर बँकेसंदर्भात मागे एकदा तक्रार झाली होती. चौकशी झाली होती. राष्ट्रवादीची काही लोकांची नावं समोर आली होती. भाजपमधील काही लोकांची नावं आली. त्यावर चौकशी करण्याची जबाबदारी राज्यावर होती. त्यावेळी राज्याचं मुख्यमंत्रीपद भाजपकडे होतं. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. त्या संबंध काळात त्यांनी काय केलं मला माहिती नाही. शिखर बँकेचा उल्लेख करण्याची गरज होती का, ते मला माहिती नाही. अशा कुठल्याही संस्थेशी आमचा संबंध नाही, अशा शब्दांत शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं.