(Politics News ) पुणे : भाजपच्या एका बड्या नेत्याला त्रास दिल्याबद्दल लोणिकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब टापरे, पोलीस कर्मचारी अमित देशमुख यांची खातीनीय चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी भाजपाचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाध्यक्ष भेगडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की….!
भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सातव यांच्या वडिलोपार्जित व अविभक्त हिश्शातील मिळकत आव्हाळवाडी गट नंबर ९०१ येथे आहे. या मिळकतीच्या वाटपाचा दावा न्यायप्रविष्ठ आहे. असे असतानाही मीरा बरेटो यांनी सातव कुटुंबातील आप्पासाहेब निवृत्ती सातव यांना काही वर्षांपूर्वी थोडे पैसे दिले होते. पैसे परत करता न आल्याने बेकायदेशीररित्या सातव परिवारातील कुणाची संमती न घेता बरेटो यांनी खरेदीखत करून घेतले.
त्यानंतर बरेटो यांनी भूमी अभिलेख अधिकाऱ्यांकडून मोजणी मागविल्यानंतर अधिकाऱ्यांनी मोजणी करण्यास स्पष्ट नकार दिला होता. कारण सदरच्या मिळकतीचे अद्याप पर्यंत वाटप पत्र न झाल्यामुळे मोजणी करता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले. असे असताना देखील १३ मार्च २०२३ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब टापरे, पोलीस कर्मचारी अमित देशमुख हे पोलीस फौजफाटासह घटनास्थळी उपस्थित होते. पोलीस अधिकाऱ्यांनी मोजणी अधिकाऱ्यांना मोजणी करावी. अशी जबरदस्ती केली.
दरम्यान, मोजणी अधिकाऱ्यांनी पंचनामा केला व मोजणी करता येणार नाही. असे स्पष्ट सांगितले. त्यानंतर चिडून जाऊन दादासाहेब सातव त्यांच्या कुटुंबावर जाणीवपूर्वक गुन्हे दाखल करून त्यांना अपमानित केले आहे. त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्या बद्दल सातत्याने वाघोली, लोणीकंद या परिसरामध्ये अशाच पद्धतीने लँड माफियांच्या सुपाऱ्या घेऊन ताबे मिळवण्याचे बेकायदेशीर काम चालू आहे. अशा भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्याची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. असे तक्रार जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.