Politics मुंबई : पहाटेच्या शपथविधीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा केला आहे. शरद पवार यांच्या आशीर्वादानेच पहाटेचा शपथविधी झाला होता. (Politics) किंबहुना भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार यावं म्हणून शरद पवार यांनीच पुढाकार घेतला होता, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीस यांच्या या दाव्याने खळबळ उडाली असून, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. (Politics)
राज्यात गाजलेल्या पहाटेच्या शपथविधीबाबत आता नव्यानं गौप्यस्फोट
राज्यात गाजलेल्या पहाटेच्या शपथविधीबाबत आता नव्यानं गौप्यस्फोट समोर आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा धक्कादायक खुलासा केला. पहाटेच्या शपथविधीवेळी शरद पवारांनी ऐनवेळी भूमिका बदलली असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्रात भाजप आणि राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी शरद पवार यांच्यासोबत आमची बैठक झाली होती. हे मी अंडरलाईन करतोय, असे सांगितले. याचबरोबर ही सत्ता आणण्यासाठी काय तयारी केली होती? शरद पवार यांच्या उपस्थितीत कशा बैठका पार पडल्या, सरकार स्थापनेचा करार कसा झाला, अजित पवार आणि मी, आम्हा दोघांना अधिकार दिले गेले. पण शपथविधीच्या तीन ते चार दिवस आधी शरद पवार यांनी माघार घेतली, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला.
फडणवीस म्हणाले की, सरकार स्थापनेला शरद पवार यांचा पूर्ण पाठिंबा होता. मी आणि अजित पवारांनी उगाच शपथ घेतली नव्हती. तर आमच्यावर तशा जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या. शरद पवार यांनी चार दिवस आधीच माघार घेतली. त्यामुळे अजित पवारांकडे दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे अजित पवारांसोबत आम्ही सरकार स्थापन केलं. आपण शपथ घेऊ. शरद पवार आपल्यासोबत येतील. राष्ट्रवादीचे आमदारही सोबत येतील, असं अजित पवार यांना वाटलं होतं, म्हणूनच शपथविधी झाला होता. पुढे आम्हाला सरकारमधून पायऊतार व्हावं लागलं, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
शरद पवार यांनी आमच्याबरोबर निवडणूक लढवली नव्हती. त्यांनी आमचा वापर केला. रणनीती आखली आणि आमची दिशाभूल करून निघून गेले. त्यांनी आमच्याबरोबर डबल गेम केला. पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरे यांनीच केलं. उद्धव ठाकरे यांनी यादरम्यान आमच्याशी नातं तोडलं होतं. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू केली होती. त्यांची चर्चा पुढे जात असताना उद्धव ठाकरे आमच्यासोबत येणार नाहीत हे आमच्या लक्षात आलं होतं.
कारण ते आमचा फोनही उचलत नव्हते. त्यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची खुणावत होती. त्यामुळे आपल्यासमोर काय पर्याय आहे याचा आम्ही शोध घ्यायला सुरुवात केली. तेव्हा आम्हाला राष्ट्रवादीच्या लोकांनी आम्ही तुमच्यासोबत येऊ शकतो असं सांगितलं. आम्हाला स्थिर सरकार हवं, असं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितलं. त्यामुळे आमची राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू झाली, असा दावाही फडणवीस यांनी केला.