Politics पुणे : मागच्यावर्षी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केली. त्यानंतर पक्षाचे नाव, पक्षचिन्ह कोणाचे, याबाबत मोठा राजकीय पेचप्रसंग उभा राहिला. (Politics) सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेल्यानंतर पक्षचिन्ह शिंदे गटाला मिळाले. या प्रकरणातून धडा घेत अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करताना मोठी खेळी केल्याचे उघड झाले आहे. (Politics)
अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याच्या दोन दिवस आधीच निवडणूक आयोगाला एक ई-मेल पाठवला होता. या मेलद्वारे त्यांनी केवळ पक्षाचं नाव आणि पक्षचिन्हावरच नाही, तर थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर दावा केला असल्याचे वृत्त नुकतेच हाती आले आहे. यामुळे शरद पवार गटात एकच खळबळ उडाली आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ताबा मिळवण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी त्यांनी बंडखोरी करण्यापूर्वीच जोरदार हालचाली सुरु केल्या होत्या, ही बाब निदर्शनास आली आहे. अजितदादांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात ते स्वतःच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे समोर आले आहे. यावरुन अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यात घेण्यासाठी वेगवान पावले उचलल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या पत्रावर ३० जून ही तारीख आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांनी ४० आमदारांच्या ठरावाची कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे सादर केली आहेत. यामध्ये अजित पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याचा ठराव करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून यावर निर्णय देणार असल्याचे म्हटले आहे. अजित पवारांनी निवडणुक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह आपल्याला मिळावे यासाठी दावा केला आहे. अनेक कार्यकर्त्यांकडून आज झालेल्या बैठकीत प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आले. तसेच याआधीच अजित पवारांनी आमदारांकडूनही प्रतिज्ञापत्र लिहून घेतल्याचे बोलले जात आहे.
शरद पवार हेच माझे दैवत आहेत. त्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा, अशी आमची अपेक्षा आहे, असे आवाहन अजित पवार यांनी काही वेळापूर्वी केले होते. त्यानंतर काही वेळातच अजितदादांनी शरद पवार यांच्यावर मात करत त्यांनाच कोंडीत पकडल्याचे उघडकीस आले आहे. निवडणूक आयोग यावर काय निर्णय घेणार ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, आज झालेल्या भाषणामध्ये चिन्ह कुठे जाणार नाही. चिन्ह काही निवडणूक ठरवत नाही. माझा अनुभव आहे. गाय वासरू, बैलजोडी, चरखा, पंजावर आम्ही निवडणुका लढवल्या आहे. घड्याळ्यावर लढलो. काही फरक पडला नाही. कुणी सांगत असेल चिन्ह आम्ही घेऊन जाऊ तर चिन्हं जाऊ देणार नाही. चिन्ह जाणार नाही. जोपर्यंत सामान्य माणसाच्या अंतःकरणात पक्षाचा विचार आहे. तोपर्यंत चिंता करण्याचं कारण नाही, अस शरद पवार म्हणाले.
राष्ट्रवादीतील दोन्ही गटांतील सामना उत्तरोत्तर रंगत असलेला दिसत आहे. आता पुढे काय होणार याची उत्सुकता जनतेला आहे.