शिरुर : भाजपाचे ज्येष्ठ नेते व शिरूर-हवेलीचे माजी आमदार बाबुराव काशीनाथ पाचर्णे (वय ७१) यांचे नुकतेच निधन झाले आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर शिरूर येथील एका खाजगी रुगणालयात उपचार सुरु होते. त्यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज आज गुरुवारी (ता.११)अखेर संपली आहे.
बाबुराव पाचर्णे यांनी शिरूर हवेलीचे आमदारपद दोन वेळेस भूषविले होते. सन २०१९ च्या विधानसभा निवडणूकी दरम्यानच त्यांच्या प्रकृतीविषयी कुरबूरी सुरू झाल्या होत्या. त्या निवडणूकीतील पराभवानंतर ते राजकारणातून काहीसे अलिप्त झाले होते.
दरम्यान, बाबुराव पाचर्णे यांना सुमारे दीड वर्षांपूर्वी कर्करोगाची लागण झाली होती. शिरूर येथील एका खाजगी रुगणालयात उपचार चालू होते. यादरम्यान, त्यांच्या प्रकृतीत अनेकदा चढउतार झाले. या कालावधीत कर्करोगाने ग्रासल्याने त्यांचे इतर अवयवही निकामी होत गेले आणि आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
बाबुराव पाचर्णे यांच्या पश्चात पत्नी, माजी जिल्हा परिषद सदस्य असलेले पूत्र राहुल पाचर्णे, एक मुलगी, जावई कर्नल महेश शेळके, नातवंडे, चार भाऊ, पाच बहिणी असा परिवार आहे. त्यांचा शिरूर आणि हवेली तालुक्यात जनसंपर्क व मित्रपरिवार असल्यांने त्यांच्या जाण्याने दोन्ही तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, दुपारी एक ते तीन वाजे पर्यत पार्थिव दर्शन पाचर्णे रेस्टहाउस बाबूराव नगर येथे असेल दुपारी तीन वाजता बी जे कॉर्नर पुणे नगर शिरुर येथे आणण्यात येईल. अंत्यविधी सायंकाळी ४ वाजता शिवतारा कृषि पर्यटन तर्डोबाचीवाडी शिरुर येथे होईल.