Param Bir Singh | मुंबई : अनिल देशमुख प्रकरणात चर्चेत आलेले निलंबित पोलिस अधिकारी परमबिर सिंह शिंदे-फडणवीस सरकारने त्यांचे निलंबन मागे घेतले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप केले होते. परमबिर सिंह यांच्या लेटरबॉम्बमुळे राज्यात खळबळ उडाली होती. त्यामुळे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारवाई झाली होती.
तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तसेच भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली त्यांना तुरुंगात जावं लागलं होतं. त्यानंतर परमबीर सिंह यांच्यावरही अनेक आरोप झाले, ज्यात त्यांचं निलंबन करण्यात आले होते.
परमबीर यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांना त्यांचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. तब्बल सात महिने ते अज्ञातवासात होते. ठाणे आणि नवी मुंबईतील पोलिस ठाण्यांमध्ये त्यांच्याविरोधात खंडणी वसूल करणे आणि अॅट्रोसिटीचे गुन्हे दाखल आहेत. मध्यंतरी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कांदिवली येथील कार्यालयात त्यांची चौकशी झाली होती. डिसेंबर २०२१ मध्ये परमबीर सिंह यांना पोलीस दलातून निलंबितही करण्यात आले होते.
दरम्यान, आज राज्य सरकारने त्यांचं निलंबन मागे घेतलं आहे. सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी सडकून टीका सुरु केली आहे.