केडगाव / गणेश सुळ : ‘स्वच्छ भारत अभियाना’तंर्गत स्वच्छता सेवा पंधरवाडा हा उपक्रम संपूर्ण देशभरात राबविण्यात येत आहे. महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 साली हा स्वच्छता उपक्रम राबविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, आज (दि.1) सकाळी दहाच्या सुमारास ग्रामीण भागात ‘एक तारीख एक तास’ हा स्वच्छता श्रमदान उपक्रम राबविण्यात येत असून, या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांच्याकडून केले होते. त्यानुसार, या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या उपक्रमाअंतर्गत दौंडचे माजी आमदार रमेश थोरात व दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे यांनी राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक 7 (दौंड) याठिकाणी स्वच्छता करून समाजाला अनोखा संदेश दिला. तसेच दौंड तालुक्यातील बोरीपार्धी, केडगाव, नाधचीवडी, देलवडी आदी गावामध्ये स्वच्छ भारत अभियानांतर्गत 1 सप्टेंबरला सकाळी 10 ते 11 अशी एक तास ‘स्वच्छता हीच सेवा’ उपक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘कचरामुक्त भारत’ अशी या उपक्रमाची संकल्पना आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्वच्छता ही सेवा मोहिमेअंतर्गत 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता ‘एक तारीख एक तास’ उपक्रम राबवितना तालुक्यातील सर्व नागरी तसेच ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रत्येक वॉर्ड, ग्रामपंचायतीमध्ये श्रमदानाद्वारे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या उपक्रमात नागरिकांद्वारे प्रत्यक्ष स्वच्छता करण्यात आली. प्रत्येक वार्ड, ग्रामपंचायत अंतर्गत जास्त कचरा असलेले क्षेत्र, बसस्थानक, राष्ट्रीय, राज्य महामार्गाच्या शेजारील जागा, जलस्रोत, नदी घाट, झोपडपट्ट्या, खुली जागा, बाजारपेठा, गल्ल्या, धार्मिक स्थळे, सार्वजनिक व खाजगी कार्यालयांचे परिसर, पर्यटन स्थळे, डोंगर परिसर, रहिवास क्षेत्र, आरोग्य संस्था, आसपासचा परिसर, शाळा, महाविद्यालय, अंगणवाडी परिसर अशा महत्त्वाच्या ठिकाणी ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
ही स्वच्छता मोहीम प्रक्रिया राबवित असताना यामध्ये तालुक्यातील सर्व स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी, शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, एनएसएसचे विद्यार्थी, महिला बचत गट, स्वच्छतासेवक, आरोग्यसेविका, अंगणवाडीसेविका यासह समाजातील सर्व घटकांनी सक्रिय सहभाग नोंदवून 1 ऑक्टोबर रोजीचा स्वच्छता मोहिमेचा हा उपक्रम यशस्वी केला. यामध्ये नाथचीवाडी येथे सरपंच सारिका चोरमले, खुटबाव येथे सरपंच गणेश शितोळे, देलवडी येथे सरपंच निलम काटे, बोरिपार्धीमध्ये सरपंच सुनील सोडनवर आदी मान्यवरांच्या मार्गदर्शनाने स्वच्छता मोहिमेचा उपक्रम यशस्वी झाला.