अजित जगताप
प्रतापगड : महाराष्ट्रात भाजपसोबत युती करून सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवप्रतापदिना निमित्त प्रतापगडावर हजर राहण्याबाबत शिवसेना (शिंदे गट) सातारा जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी मंत्रालयात जाऊन निमंत्रण दिले. परंतु, शिवप्रताप दिनी प्रतापगडावर हजर न होता मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले कबरी समोरील अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले.
मार्गशीर्ष शुध्द सप्तमी शके १५८१ गुरुवार दि. १० नोव्हेंबर १६५९ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानाचा वध करुन महाराष्ट्राला संकटमुक्त केले. हा छत्रपती शिवाजी महाराजाच्या जीवनातील सर्वोच्य पराक्रम असून हिंदवी स्वराज्याचा पहिला स्वातंत्र्यदिन होता. या शुभदिनी प्रतापगडावर महाराष्ट्र शासनाच्या वतीने उत्सव ही पंधरा वर्षापासून सुरु असलेली परंपरा आहे. तथापि त्यामुळे शिवकार्याबाबत जनतेला संदेश देण्याची महत्वाची संधी अद्यापि उपयोगात आणलेली नाही. अशी भावना शिवप्रेमींनी झाली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचे मूळ निवासस्थान प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे, त्यामुळे यंदा प्रतापगडावरील शिवप्रतापदिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, ही महाराष्ट्रातील समस्त शिवभक्तांच्या वतीने आग्रहाची विनंती करण्यात आली होती.
शिवप्रतापदिनाला राष्ट्रीय उत्सवाचा दर्जा देऊन महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयामध्ये शिवप्रतापदिन साजरा करण्याचा आदेश देऊन मंत्रालयात त्यादिवशी शिवप्रतिमेचे पूजन भव्यतेने व्हावे, ही सुध्दा सर्व शिवभक्तांची इच्छा आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धर्मवीर संभाजी महाराजांची प्रतिमा समितीच्या वतीने देण्यात आली. शिवप्रतापगड उत्सव समितीच्या वतीने मिलिंद एकबोटे, पुरुषोत्तम जाधव, शिवप्रतापगड उत्सव समिती अध्यक्ष संजय भोसले आणि असंख्य कार्यकर्ते यांच्या वतीने विनंती करण्यात आली होती. पण, मुख्यमंत्री शिंदे प्रतापगडावर उपस्थित राहू शकले नाहीत. गेली अनेक वर्षे प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखान कबरी भोवती मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली होती. स्थानिक व जिल्हा प्रशासनाने योग्य वेळी कारवाई केली नसल्याने हा प्रश्न निर्माण झाला. आज सकाळ पासून प्रतापगड परिसरात अतिक्रमण काढताना स्वतः पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.यावेळी शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, प्रतापगडावर अफजलखान सारख्या बलाढ्य शत्रूचा वाघनख्याने कोथळा बाहेर काढला होता. ही वाघ नखे रुस्तुमे जमान याने बनवून दिली होती. अफजलखानचे वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर हल्ला केल्यानंतर कुलकर्णी यांना सुध्दा यमसदनी पाठविण्यात आले होते. त्यामुळे प्रतापगड म्हणजे ऐतिहासिक वास्तू नसून छत्रपती शिवराय यांच्या समतेची शिकवण देणारी व अन्यायाविरुद्ध लढणारी ऐतिहासिक घटना घडली आहे. त्याचे स्मरण नेहमीच होत आहे अशी प्रतिक्रिया शिवप्रेमी अमर गायकवाड, इम्रान बागवान,सुरेश मोरे यांनी दिली.