Navneet Rana on Nitish Kumar : नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहार विधानसभा अधिवेशनादरम्यान, महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. यावरून सर्वच स्तरांतून त्यांच्यावर टीका होत आहे. विधानसभेत लोकसंख्या आणि महिलांचे शिक्षण यावर ते भाष्य करत होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. यावर आता नवनीत राणा यांनी त्यांचा संताप व्यक्त केला आहे.
नवनीत राणांकडून संताप व्यक्त
नितीश कुमार यांनी देशातील महिलांचा अपमान केल्याचं म्हणत, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जाणून बुजून असं राजकीय वक्तव्य केलं आहे. यानंतर कोणत्याही राजकीय पक्षांनी त्यांना साथ देऊ नये. 75 वर्षाच्या व्यक्तीने असे अपशब्द काढल्याने संपूर्ण देशभरातील महिलांनी रस्त्यावर उतरले पाहिजे. महिलांबद्धल आधी विधान करायचं आणि नंतर माफीनामा काढायचा, असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. नितीश कुमार यांनी माफी नाही, तर राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे.
नेमकं काय म्हणाले नितीश कुमार?
नितीश कुमार म्हणाले की, लग्नानंतर पुरूष हे पत्नीला शारिरीक संबंध ठेवायला सांगतात, मात्र आम्ही बिहारच्या महिलांना शिक्षीत केल्यानंतर त्या योग्य वेळी आपल्या पतीला तसं करण्यापासून रोखतात, ज्यामुळे बिहारची लोकसंख्या नियंत्रणात आहे.
नितीश कुमार यांची प्रतिक्रीया
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी माफी मागितली आहे. लोकसंख्या नियंत्रणाबाबत वक्तव्य करत होते. तुम्हाला दुखावले असेल तर मी माफी मागतो, असे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले. मी बिहारमध्ये शिक्षणासाठी इतका पैसा निश्चित केला आणि मुलींना शिकवायला सुरुवात केली, असे मुख्यमंत्री म्हणाले. माझ्या मनातून काही शब्द निघाले, मी पुरुष आणि स्त्रीबद्दल माफी मागतो.