Mumbai News : मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची अजित पवार गटाच्या ३० आमदारांनी आज पुन्हा एकदा भेट घेतली. या आमदारांनी तासभर शरद पवार यांच्याशी चर्चा केली. सलग दुसऱ्या दिवशी अजितदादा गटाने शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. या भेटीनंतर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पटेल म्हणाले की, शरद पवार साहेबांना आम्ही पक्ष एकसंघ राहावा अशी विनंती केली. पवारांनी कालप्रमाणेच आजही आमचे सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. मात्र, काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. त्यांच्या मनात काय आहे, हे मी आज बोलू शकत नाही, असे पटेल यांनी स्पष्ट केले.
शरद पवार गटाकडून भेटीबाबत कोणतीही प्रतिक्रिया नाही
पटेल म्हणाले की, कालप्रमाणे आजची भेट पूर्वनियोजित नव्हती. शरद पवार चव्हाण सेंटरला येणार असल्याची माहिती काढली. त्यामुळे आम्ही येथे आलो. सर्वांनी शरद पवार यांची भेट घेतली. (Mumbai News) कालच्या भेटीत आमच्यासोबत सर्व आमदार उपस्थित नव्हते. या आमदारांना पवार साहेबांची भेट घेता आली नाही, त्यामुळे आम्ही त्यांना आज सोबत घेऊन आलो, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही चव्हाण सेंटरला आलो होतो. काल रविवार असल्याने आमदार मतदारसंघात होते. त्यांना भेट घेता आली नव्हती. (Mumbai News) आज विधीमंडळाचे अधिवेशन सुरू झाल्याने अनेक आमदार मुंबईत होते. केवळ मंत्रीच नव्हे तर इतरही आमदारांना शरद पवारांचे आशीर्वाद घ्यायचे होते, ती संधी आम्ही त्यांना मिळवून दिली आहे, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.
दरम्यान, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की शरद पवारच आमचे नेते आहेत, आणि राहतील. (Mumbai News) कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनीही शरद पवार यांच्या भेटीबाबत प्रतिक्रीया देणे टाळले. शरद पवार गटाकडून या भेटीबाबतची कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे या भेटीत आणखी काय घडले, याची माहिती समोर आलेली नाही.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : वडिलांच्या डोळ्यांदेखत मुलगा धरणात बुडाला अन् अनर्थ घडला