पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच मोठी घोषणा केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर दोन ते तीन भागात चित्रपट बनवण्याची मोठी घोषणा ठाकरे यांनी केली आहे. या प्रोजेक्टवर काम सुरु असल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे.
आगामी हर हर महादेव या चित्रपटामुळे राज ठाकरे सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनचा एक भाग म्हणून अभिनेते सुबोध भावे यांनी राज ठाकरेंची खुली मुलाखत घेतली. या चित्रपटाला राज ठाकरे यांनी आवाज दिला आहे. हिंदी, मराठीसह पाच भाषेत एकाच वेळी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
राज ठाकरे म्हणाले,”कॉलेजमध्ये असताना मी गांधी हा चित्रपट सलग 30 ते 32 वेळा पाहिला. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांवरही असाच एखादा चित्रपट यावा असे वाटले होते. त्यावेळी मी त्यावर मालिका बनवण्याचा विचार केला होता. तर नितीन चंद्रकांत देसाई मालिका घेऊन आले. मला वाटतं शिवाजी महाराजांना तीन ते चार घटनांमध्ये अडकवून ठेवता येणार नाही. शिवाजी महाराज व्यापक विषय आहे आणि आता तंत्रज्ञान खूप पुढे गेले आहे. म्हणूनच मी त्यांच्यावर दोन ते तीन भागात चित्रपट आणण्याचा विचार केला असून त्यावर कामदेखील सुरु केले आहे,”
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तुमचा जन्म झाला असता तर तुम्हाला कोण व्हायला आवडले असते? असा प्रश्न भावे यांनी विचारला असता राज ठाकरेंनी मन जिंकणारे उत्तर दिले. “मला शिवाजी महाराजांचा घोडाही व्हायला आवडले असते,” असे ते म्हणाले.