बारामती : महाराष्ट्रात ४५ हून अधिक लोकसभा जागा आणि २०० हून अधिक विधानसभेच्या जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजपाच्या युतीच्या बळावर आम्ही निवडून आणू. असा निर्धार भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज बारामती दौऱ्यावर असून तिथे बोलताना बावनकुळेंनी भाजपाच्या ‘मिशन बारामती’चीही घोषणा केली. आणि वरील निर्धार बावनकुळे यांनी केला आहे.
पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले, “येत्या दोन महिन्यात मी सर्व जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. आमच्या संघटनेच्या माध्यातून पुढच्या काळात होणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, येणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुकांमध्ये आम्ही शिवसेना आणि भाजपा युतीच्या माध्यमातून ४५ हून जास्त जागा जिंकून आणू”,
“देशात अनेक गड उद्ध्वस्त झाले आहेत. जेव्हा संघटना मजबूत होते, तेव्हा संघर्ष करण्याची ताकद येते. जेव्हा ती ताकद येते, तेव्हा अनेक चांगले गड उद्ध्वस्त होतात, हा देशाचा इतिहास आहे. त्यामुळे कुणाचा गड, वर्चस्व राहात नाही. वेळेनुसार ते बदलत असते. आम्ही ठरवले आहे की आमची ताकद तेवढी वाढवायची आणि आमच्या भरवश्यावर शिवसेना-भाजपाने चांगली कामगिरी करायची आणि ही जागा निवडून आणायची”, असा निर्धार यावेळी बावनकुळेंनी बोलून दाखवला.
दरम्यान, पुढच्या १८ महिन्यांतकेंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण या ५ ते ६ वेळा बारामती दौऱ्यावर येणार आहेत. प्रत्येक वेळी तीन दिवस मुक्कामी असणार आहेत. इथल्या विकासाची परिस्थिती काय आहे, केंद्राकडून विकासाबाबत काय अपेक्षा आहे, राज्य सरकारच्या माध्यमातून काय करता येईल. या दृष्टीने बारामती दौऱ्यांमध्ये विचार करणार आहेत.