Manoj Jarange Patil : कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांची १७ नोव्हेंबरला कोल्हापुरातील दसरा चौकात सभा पार पडणार आहे, अशी माहिती सकल मराठा समाजाचे समन्वयक वसंतराव मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दुपारी दोन वाजता सभेला सुरुवात होणार आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरात सभा होईल. तत्पूर्वी, ते नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारक येथे नतमस्तक होणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातून तससेच आसपासच्या जिल्ह्यातून दोन ते पाच लाख मराठा बांधव सभेस येण्याची शक्यता आहे. किंबहूना त्यापेक्षा जास्त नागरिक सभेला येणार आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सभा घेत आहेत. त्यासाठीच १७ नोव्हेंबरला ते कोल्हापुरात येत असून, सर्व तालुक्यांतील समन्वयक ग्रामीण भागातील मराठा बांधवांना सभेसाठी येण्याकरिता आवाहन करत आहेत. उन्हाचा तडाखा लक्षात घेता भगवी टोपी, भगवे झेंडे, पाण्याची बाटली घेऊन बांधवांनी सभेच्या ठिकाणी यावे. लाखोंच्या संख्येने बांधव येणार असल्याने पार्किंगची व्यवस्था मंगळवारी (ता. १४) जाहीर केली जाणार आहे.’
मराठा आरक्षणाचा प्रश्न चाळीस वर्षे रखडला आहे. तो सुटावा, अशी मराठा समाजाची भावना आहे. समतेच्या नगरीत राजर्षी शाहूंच्या पायाशी ही सभा होत असून, सभेसाठी पोलीस प्रशासनाने सहकार्य करावे. सभेला होणारी गर्दी लक्षात घेता दहा स्क्रीन ठिकठिकाणी लावण्यात येणार आहेत.’,असे इंदुलकर म्हणाले आहेत.