पिंपरी : राज्यातील भाजपा-शिवसेना महायुतीचे सरकार हे शेतकऱ्यांना बांधावर जावून नव्हे, तर वस्तुनिष्ठ पंचनामे करुन महाविकास आघाडीपेक्षा जास्त नुकसान भरपाई देण्यासाठी कटिबद्ध आहे. आगामी दहा दिवसांत पंचनामे पूर्ण होतील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एकत्रच निर्णय होईल. महाविकास आघाडीचे मंत्री केंद्राकडे प्रस्ताव पाठवल्याची सबब सांगत होते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीपेक्षा मोठी नुकसान भरपाई देतील, असा विश्वास माजी मंत्री तथा भाजपाचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
भाजपातर्फे लोकसभा प्रवास योजना उपक्रमांतर्गत शिरुर लोकसभा मतदार संघाची बैठक पार पडली. यावेळी मतदार संघाच्या प्रभारी माधुरी मिसाळ, क्लस्टर प्रमुख रविकांत कर्जतकर, संयोजक ॲड. धर्मेंद्र खांडरे, सहक्लस्टर प्रमुख रवी अनासपूरे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, माजी जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
माजी मंत्री बावनकुळे म्हणाले की, देशात वीज बचतीसाठी प्रयत्न होत आहेत. त्यामुळे प्रिपेड मीटर प्रणाली ग्राहकांसाठी आणि राज्यासाठीसुद्धा फायदेशीर राहणार आहे. या यंत्रणेमुळे ग्राहकांना वीज बचतीची सवय लागणार असून, अतिरिक्त वीज वापर थांबणार आहे. त्यामुळे या प्रणालीचे स्वागतच केले पाहिजे. महाराष्ट्रातील वीज वितरण व्यवस्थेत सुधार करण्यासाठी महाराष्ट्राच्या शिंदे-फडणवीस सरकारने मोठी घोषणा केली आहे.
वितरण कंपन्या आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या योजनेसाठी महावितरण कंपनीच्या ३९ हजार ६०२ कोटी आणि बेस्टच्या ३ हजार ४६१ कोटी रकमेच्या सविस्तर प्रकल्प अहवालास मान्यता देण्यात आली. हा निर्णय राज्याच्या हिताचा आहे. प्रिपेड किंवा स्मार्ट मीटर बसवल्यास ग्राहकाद्वारे जितक्या पैशाचे रिचार्ज केले जाईल तेवढी वीज त्यांना वापरण्यास मिळेल आणि त्यानंतर मीटर आपोआप बंद होईल. त्यामुळे कंपनीची सोय होणार आहे. स्मार्ट आणि प्रीपेड योजनेअंतर्गत कोणत्याही ग्राहकाकडून मीटर घेण्यासाठी चार्जेस (शुल्क) घेतले जाणार नाहीत. तसेच ही प्रणाली ग्राहकांवर बंधनकारक नाही, असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.
काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांचा निषेध…
काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याचा मी निषेध करतो. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा एक आदिवासी महिला देशाच्या सर्वोच्च पदावर पोहचली आहे. या पदाचा सर्वांनी आदर केला पाहिजे. चौधरी यांचे वक्तव्य निंदनीय आहे, त्यांचा मी निषेध करतो. अधीर रंजन चौधरी आणि काँग्रेसने देशाची माफी मागावी,’ अशी मागणीही यावेळी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.