मुंबई, ता. 4: क्रूरकर्मा औरंगजेबाबद्दल समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी गौरवोग्दार काढल्याचे पडसाद आज विधिमंडळात उमटले असून सत्ताधारी पक्षांसह विरोधकांनीही अबू आझमीना देशद्रोही ठरवून सभागृहातून निलंबित करावे अशी मागणी केली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की औरंगजेबाचा गौरव करणारे अबू आझमी देशद्रोही आहे. हा स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान असून तो आम्ही कदापिही सहन करणार नाही. त्याचे निलंबन झालेच पाहिजे..
दरम्यान आज सकाळी विधिमंडळाच्या कामकाजाला सुरूवात झाल्यापासूनच सत्ताधारी आणि विरोधकांनी अबू आझमी यांच्या वक्तव्याचा निषेध करून सभागृह डोक्यावर घेतले. त्यामुळे सकाळपासून सभागृह तीन वेळा तहकूब करावे लागले.
आमदार सुधीर मुनगंटीवार, मंत्री उदय सामंत, मंत्री गुलाबराव पाटील, शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज सभागृहात आक्रमक पावित्रा पाहायला मिळाला. या सर्वांनीच आमदार अबू आझमी यांच्यावर कारवाई करून त्यांचे निलंबन करण्याची मागणी केली. त्यांना उपस्थित आमदारांनीही पाठिंबा दिल्याने सभागृहात एकच गोंधळ उडाला. परिणामी सभागृहाचे कामकाज वारंवार तहकूब करावे लागले.
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. मात्र तो अबू आझमी आणि औरंगजेब प्रकरणावरून गाजताना दिसत आहे.