नागपूर: विदर्भातील अनेक पराभूत उमेदवारांनी निवडून आलेल्या आमदाराविरोधात मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केल्या आहेत. हायकोर्टाने विदर्भातील तीन आमदारांना नोटीस बजवल्या. यात भाजपचे प्रताप अडसड, संजय कुटे तर शिवसेनेचे (शिंदे) संजय गायकवाड यांचा समावेश आहे. तिन्ही याचिकांवर सोमवारी न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
यात मुख्यत्वे आघाडीच्या तसेच महायुतीविरुद्ध लढलेल्या उमेदवारांचा समावेश आहे. प्रताप अडसड यांच्याविरुद्ध काँग्रेसचे वीरेंद्र जगताप, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध शिवसेनेच्या (ठाकरे गट) जयश्री शेळके आणि संजय कुटे यांच्याविरुद्ध काँग्रेसच्या स्वाती वाकेकर यांनी या याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांमध्ये ईव्हीएमने निवडणूक घेण्यापूर्वी आवश्यक त्या कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता निवडणूक आयोगाने केली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ईव्हीएमद्वारे निवडणूक घेण्यासाठी नोटिफिकेशन निवडणूक आयोगाने काढले नाही, निकालानंतर पराभूत उमेदवारांना सीसीटीव्हीचे फुटेज, फॉर्म नंबर १७ दिले जात नाही. व्हीव्हीपॅटची मोजणीसुद्धा केली जात नाही, असे आरोप करण्यात आले आहेत. हायकोर्टाने निवडणूक आयोग तसेच इतर पक्षकारांची नावे वगळण्याचे आदेश देत केवळ विजयी उमेदवारांना नोटीस बजावण्याचे आदेश दिलेत. संबंधितांनी या नोटीसवर चार आठवड्यांत उत्तर सादर करणे अपेक्षित आहे. शेळके व वाकेकर यांच्याकडून अॅड. आकाश मून, अॅड. पवन डहाट, तर जगताप यांच्याकडून अॅड. ऋग्वेद ढोरे यांनी बाजू मांडली.