राजेंद्रकुमार गुंड
Madha News माढा : मागील वर्षापासून माढा-मानेगाव-खैराव ही एसटी बससेवा सकाळी व सायंकाळी एक फेरी अशाप्रकारे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सुरू आहे. (Madha News) परंतु या मुख्य मार्गापासून अडीच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या चव्हाणवाडी गावाला वगळून ही बससेवा सुरू केल्यामुळे तेथील विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय व कुचंबना होत आहे. (Madha News)
तेव्हा ही बससेवा चव्हाणवाडी मार्गे सुरु करावी, यासाठी आमदार बबनदादा शिंदे व श्री संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालय आनंदनगर-मानेगाव, केवड-चव्हाणवाडी ग्रामपंचायत व प्रवाशी सेवा संघाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी मागणी केली होती. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत बसफेरी सुरू करण्याचे आश्वासन आगार व्यवस्थापक प्रसाद कुलकर्णी यांनी दिले आहे.
केवड-चव्हाणवाडी या संयुक्त ग्रामपंचायत असलेल्या चव्हाणवाडी गावाची लोकसंख्या 400 च्या दरम्यान असून, गावात फक्त इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग सुरू आहेत. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी येथील विद्यार्थ्यांना मानेगाव व माढ्याकडे जावे लागते. ही वस्तुस्थिती आहे. या गावातील दररोज 30 ते 35 विद्यार्थी व नागरिक कामाच्या निमित्ताने माढा व मानेगावकडे जातात. परंतु त्यांना बस पकडण्यासाठी पाच किलोमीटर कडक ऊन, वारा, पाऊस व थंडीत पायपीट करावी लागते. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे लोटली तरीही चव्हाणवाडी गाव हे एसटी बसने जोडलेले नाही. मागील वर्षांपर्यंत खराब रस्त्याचे कारण होते. परंतु आता आ. बबनदादा शिंदे यांच्या प्रयत्नातून एक कोटींच्या निधीतून गावापर्यंत संपूर्ण रस्त्याचे पक्के डांबरीकरण झाले आहे. त्यामुळे एसटी बस सेवा सुरू करण्यासाठी कोणतीही अडचण नसल्याने कुर्डूवाडी आगारप्रमुख व आ.बबनराव शिंदे यांच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ही बससेवा तातडीने सुरू होणार आहे.
दरम्यान, कुर्डूवाडी येथील आगार व्यवस्थापक प्रसाद कुलकर्णी यांच्याकडे चव्हाणवाडी मार्गे बससेवा सुरू करण्याची मागणी करताना सहाय्यक वाहतूक अधिक्षक विजय हांडे, लेखाकार विजय बुटे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक शिवराज पाटील, मुख्याध्यापक प्रवीण लटके यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.