दीपक खिलारे
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या बोरी गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजप नेते हर्षवर्धन पाटील व माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये शुक्रवारी (ता.२४) प्रवेश केल्याने पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला गावामध्ये मोठे खिंडार पडले आहे.
बोरी येथे भाजप प्रवेशाचा मोठा सोहळा पार पडला. प्रारंभी हर्षवर्धन पाटील व राम शिंदे यांची गावातून घोड्यावरून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर भाजप शाखेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. बोरी गावातून भाजप प्रवेशात सुरुवात झाल्याने इंदापूर तालुक्यात परिवर्तन निश्चित असल्याचे यावेळी वक्त्यांनी भाषणात नमूद केले.
यावेळी प्रियांका ठोंबरे, स्वाती वाघमोडे, गौरी ढालपे, सचिन ढालपे, कांचन धायगुडे या ग्रा. पं. सदस्यांसह अँड. मधुकर वाघमोडे, सचिन वाघमोडे, माजी ग्रा. स. सदस्य रमेश पवार, दयानंद चव्हाण, विजय देवडे तसेच आकाश गवळी, हनुमंत लांबाते, शिवदास जगताप, गणेश पवार, सागर देवडे आदी गावातील असंख्य युवक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच यावेळी कर्दनवाडी येथील भैरवनाथ पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष विशाल जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी बोलताना माजी मंत्री राम शिंदे म्हणाले, बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला झटका बसणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा अवघ्या साडेतीन जिल्ह्यापुरता मर्यादित पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पायाखालची वाळू घसरत चालली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्ण कार्यक्रम केल्याशिवाय भाजप गप बसणार नाही, असा इशारा यावेळी बोलताना प्राध्यापक राम शिंदे यांनी दिला. तसेच माणूस दिसेल तसे बोलल्याने शब्दाला किंमत राहत नाही, असा टोला राम शिंदे यांनी आ. दत्तात्रय भरणे यांना नाव न घेता लगावला.
बोरी गावाने मागील विधानसभा निवडणुकीत जर साथ दिली असती, तर निवडणुकीत चित्र वेगळे दिसले असते व आज हर्षवर्धन पाटील मंत्री दिसले असते, असे यावेळी बोलताना राम शिंदे यांनी सांगितले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, मी वीस वर्षे मंत्री असताना सणसर कट मधून खडकवासल्याचे पाणी या परिसरासाठी मिळत होते. सध्याच्या लोकप्रतिनच्या काळात गेली साडे-आठ वर्षात तालुक्यात नवीन एक गुंठा क्षेत्र सिंचनाखाली आणले नाही, अशी टीका विद्यमान लोकप्रतिनिधींवर केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-भाजप सरकारने लाकडी-लिंबोडी योजनेसाठी टेंडर काढले असून, येत्या काही आठवड्यात निविधा फायनल होईल अशी माहिती भाषणात हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
विकास कामासाठी दूरदृष्टी असलेले नेतृत्व लागते. नुसती हावभाव करून गोड बोलून विकास होत नाही, अशी टीकाही हर्षवर्धन पाटील यांनी आ.भरणे यांचे नाव न घेता केली. आपण वीस वर्षे मंत्री असताना कधी कोणाची अडवणूक केली नाही, असे त्यांनी सांगितले.
तसेच भाजपमध्ये प्रवेश केल्यावर नवा जुना असा वाद नसतो, सर्वांना मान-सन्मान मिळेल, सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन काम करणारा भाजप पक्ष आहे, असेही भाषणात हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
दरम्यान, पुणे जिल्हा भाजपच्या उपाध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र वैभव देवडे यांना तसेच भटक्या विमुक्त जिल्हा उपाध्यक्षपदी निवडीचे पत्र बापू लाळगे यांना देण्यात आले. या कार्यक्रमात राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष गणेश भेगडे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, बाबा महाराज खारतोडे, वसुंधरा सोशल फाउंडेशन अध्यक्ष वैभव देवडे, सचिन वाघमोडे आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी अविनाश मोटे, इंदापूर तालुकाध्यक्ष अँड. शरद जामदार, बारामती तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे आदींसह इंदापूर तालुक्यातील भाजपचे सर्व पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन वसुंधरा सोशल फाउंडेशन, जय मल्हार भैरवनाथ परिवर्तन पॅनल व भाजप बोरी यांनी केले होते. तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड. मधुकर वाघमोडे यांनी केले.